रानभाज्यांचे जतन-संवर्धन काळाची गरज

कुडाळ प.स. च्या राजभाज्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
गावागावांत प्रदर्शन भरविण्याचे वक्त्यांकडून आवाहन
निसर्गाचा अनमोल ठेवा असलेल्या रानभाज्यांचे जतन व संवर्धन होणे काळाची गरज आहे. रानभाज्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन रानभाजी प्रदर्शन व पाककृती महोत्सव आयोजित करावेत, असे आवाहन कार्यक्रमातील प्रमुख वक्त्यांनी केले. रानभाज्यांचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कुडाळ पंचायत समितीच्या वतीने येथील महालक्ष्मी हॉलमध्ये सोमवारी तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शन व पाककृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात तब्बल ५१ प्रकारच्या ताज्या (लाइव्ह) रानभाज्या तसेच १५० हून अधिक चविष्ट पाककृतींचे स्टॉल मांडण्यात आले होते. ग्रामीण भागातील महिलांनी विविध रानभाज्यांपासून तयार केलेल्या आकर्षक व नाविन्यपूर्ण पदार्थांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साईल यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने, तर कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी उपसभापती सीताराम तेली, जिल्हा परिषद सदस्य आरती पाटील, सुप्रिया वालावलकर, रुपेश कानडे, नागेश आईर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, पंचायत समिती सदस्य भाऊ प्रभू, बाळकृष्ण मडव, माजी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, गटविकास अधिकारी श्री. निवेकर, सरपंच संघटना अध्यक्ष राजन परब, गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, अधीक्षक श्रीमती कार्लेकर, पंचायत समिती सदस्य अर्चना बंगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच परीक्षकांचा सत्कार करण्यात आला.
जि. प. उपाध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साईल यांनी ऋतुमानानुसार उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचे आणि पारंपरिक आहारपद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. पूर्वीचे आपले पूर्वज निसर्गाच्या चक्रानुसार आहाराचे नियोजन करीत असल्याने त्यांचे आरोग्य उत्तम राहिले. आजच्या आधुनिक जीवनशैलीतही निरोगी पिढी घडवायची असेल, तर रानभाज्यांचा आहारातील वापर वाढविणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
महिलांनी तयार केलेल्या अळूच्या देठांच्या कुरकुरीत कापांसह लाजरीची भाजी, सरबत आणि विविध पाककृतींचे त्यांनी विशेष कौतुक केले. केवळ प्रदर्शन भरवून न थांबता रानभाज्यांचे संवर्धन, लागवड आणि व्यावसायिक उत्पादनाच्या दृष्टीनेही प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावविकासाची दोन चाके असलेले सरपंच व ग्रामसेवक यांनी अशा उपक्रमांना गावागावांत चालना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
सभापती मिलिंद नाईक यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत लाजरीची भाजी व अळूच्या विविध रानभाज्यांचे आरोग्यदायी फायदे सांगितले. रासायनिक पद्धतीने उत्पादित भाज्यांच्या तुलनेत रानभाज्या नैसर्गिक व पोषक असून, त्यांचा दैनंदिन आहारात समावेश करणे गरजेचे आहे. रानभाज्यांचे संवर्धन करून त्यांचे महत्त्व घराघरांत पोहोचविण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जि. प. सदस्य रुपेश कानडे यांनी प्रदर्शनातील रानभाज्या नैसर्गिक पद्धतीने उपलब्ध होणाऱ्या व आरोग्यदायी असल्याचे सांगत उपक्रमाचे कौतुक केले. आरती पाटील यांनी गेल्या चार वर्षांपासून गावागावांत रानभाजी प्रदर्शन भरविले जात असल्याने मुलांनाही रानभाज्या आणि त्यांचे महत्त्व समजू लागल्याचे सांगितले. माजी जि. प. अध्यक्ष काका कुडाळकर यांनी बदलत्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर निरोगी आरोग्यासाठी पारंपरिक व नैसर्गिक आहाराकडे वळण्याची गरज व्यक्त केली.
स्थानिक महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच रानभाज्यांपासून तयार होणाऱ्या पाककृतींना प्रोत्साहन देण्यासाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी ७ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये, तर पाच महिलांना प्रत्येकी १ हजार रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
मंत्रालयातील महत्त्वाच्या बैठकीमुळे कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेले आमदार निलेश राणे यांनी दूरध्वनीवरून महोत्सवाला तसेच सहभागी महिलांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसभापती सीताराम तेली यांनी केले. ग्रामीण भागातील महिलांनी रानभाज्यांपासून तयार केलेल्या विविध चविष्ट व नाविन्यपूर्ण पदार्थांनी महोत्सवाला विशेष रंगत आणली.






