जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या त्रिसूत्रीने यश मिळवा – प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर

कुडाळात राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा

स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आव्हाने स्वीकारून आत्मविश्वासाने वाटचाल करावी. जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल केल्यास निश्चितच यश संपादन करता येते, असे प्रतिपादन कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी केले.
दत्ताविष्कार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग, आरंभ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि आस्था फाऊंडेशन, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने बॅ. नाथ पै कॉलेज, एमआयडीसी कुडाळ येथे आयोजित राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. ज्ञान, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बॅ. नाथ पै संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, दत्ताविष्कार फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल चव्हाण, केंद्रप्रमुख गोविंद चव्हाण, आरंभ प्रतिष्ठानचे उदय शिरोडकर, अध्यक्ष डॉट कॉम असोसिएशनचे अध्यक्ष संजय बगळे, त्रिमूर्ती संगीत विद्यालयाचे संचालक डॉ. राहुल गव्हाणकर यांच्यासह राजाराम गव्हाणकर, स्वप्नाली सावंत, विद्या शिरोडकर, सायली शिरोडकर, आयुषी चव्हाण, दिलीप मसके, यलाप्पा दळवी, मारुती गुंजाळ, सहदेव घाडी, मिनीनाथ आडसरे, राजेश परब, सहदेव पालकर, योगेश जाधव, श्री. आजगावकर, विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर म्हणाल्या की, घोषवाक्याच्या माध्यमातून कमी शब्दांत प्रभावीपणे समाजजागृती करता येते. आजच्या एआय आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या वाटचालीत पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, मुलाची आवड, क्षमता आणि त्याला कोणत्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, हे लक्षात घेऊन पालकांनी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.
अमोल चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी तिन्ही संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. शैक्षणिक क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच महिलांनी छोट्या व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधावी, यासाठीही विविध व्यावसायिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उमेश गाळवणकर यांनी विद्यार्थ्यांमधील आत्महत्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगून पालकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त केली. छोट्या-छोट्या कारणांवरून मुले टोकाचा निर्णय घेत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांना समजून घेतले पाहिजे आणि त्यांच्यावर अनावश्यक शैक्षणिक बंधने न लादता मोकळ्या वातावरणात त्यांना शिक्षणाचा सामना करण्यास सक्षम केले पाहिजे, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात उदय शिरोडकर यांनी तिन्ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य आणि कला क्षेत्राशी निगडित असून, या सर्व क्षेत्रांना शक्य ते सहकार्य करण्याच्या उद्देशाने कार्यरत असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिमूर्ती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. सूत्रसंचालन मारुती गुंजाळ यांनी केले, तर यलाप्पा दळवी यांनी आभार मानले.

error: Content is protected !!