‘पोलीस दूत’ विद्यार्थ्यांनी दिले सुरक्षिततेचे धडे

चेंदवणच्या श्री देवी माऊली विद्यालयात जनजागृती

चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे बालसुरक्षा, POCSO कायदा, बालहक्क, सायबर गुन्हे आणि रस्ता सुरक्षा या विषयांवर विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिक पवार यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना बालहक्क, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, सुरक्षित वर्तन, ऑनलाइन सुरक्षितता, वैयक्तिक माहिती व गोपनीयतेचे महत्त्व, सोशल मीडियाचा जबाबदार वापर तसेच सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विद्यालयातील ‘पोलीस दूत’ म्हणून कार्यरत असलेल्या इयत्ता नववीतील कुमारी अवनी शृंगारे, सोहम नाईक, लावण्य साळसकर आणि जिया खोबरेकर यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर प्रभावीपणे मार्गदर्शन केले. नोडल शिक्षक संतोष सांगळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेल्या या जनजागृतीला उपस्थित विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वाहतूक शाखेतर्फे रस्ता सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. निवती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भीमसेन गायकवाड, बिट हवालदार कांदळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच चेंदवण गावचे पोलीस उमेश शृंगारे यांचे सहकार्य लाभले. सिंधुदुर्ग पोलीस दलातील पीएसआय नंदिनी शिंदे यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
‘पोलीस दूत’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वतःची सुरक्षितता, इतरांचा आदर, जबाबदार ऑनलाइन वर्तन तसेच कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा अनुचित अनुभव आल्यास तो लपवून न ठेवता पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीला सांगण्याची जाणीव निर्माण करण्यात आली.
यावेळी संतोष सांगळे व उर्मिला गवस यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उमेश धर्णे, शरद नाईक, सिद्धी शिरसाट, सुप्रिया चेंदवणकर, विजय कांबळी यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
बालसुरक्षा, सायबर जनजागृती आणि रस्ता सुरक्षा या तीन महत्त्वपूर्ण विषयांवर एकाच व्यासपीठावर मार्गदर्शन मिळाल्याने हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व जबाबदार भविष्यासाठी उपयुक्त ठरला.

error: Content is protected !!