एमआयडीसीचा भूखंड मंगल कार्यालयासाठी ?

कुडाळ एमआयडीसीतील भूखंडावरून वाद ; ग्रामस्थ आक्रमक

वैभव नाईकांसह ग्रामस्थांचा एमआयडीसी अधिकाऱ्यांना जाब

कुडाळ एमआयडीसीतील उद्योगांसाठी राखीव असलेल्या भूखंडाचा मंगल कार्यालय आणि रामदेव बाबा मंदिरासाठी वापर केला जात असल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थ आणि उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एमआयडीसी कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. भूखंड वाटपात अनियमितता होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
कुडाळ एमआयडीसीतील संबंधित भूखंड एका राजस्थानी व्यक्तीला मंगल कार्यालय व रामदेव बाबा मंदिर उभारण्यासाठी देण्यात आल्याचे सांगितले जात असून, या ठिकाणी उत्खननही करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याबाबत माजी आमदार वैभव नाईक, स्थानिक ग्रामस्थ आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसीचे अधिकारी अविनाश रेवणकर यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी श्री. रेवणकर यांनी संबंधित भूखंडाचे अद्याप वाटप झाले नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर, भूखंडाचे वाटप झालेले नसताना त्या ठिकाणी उत्खनन कसे करण्यात आले, असा सवाल वैभव नाईक आणि ग्रामस्थांनी उपस्थित केला. उत्खननाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर सर्व संबंधित अधिकारी व ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भूखंडाची पाहणी केली. पाहणीदरम्यान तेथे उत्खनन झाल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना पुन्हा धारेवर धरले.
शासकीय जमिनीवर परवानगीशिवाय उत्खनन करण्यात आले असल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी वैभव नाईक आणि ग्रामस्थांनी केली. त्यानंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी शासकीय जमिनीवर अवैध उत्खनन झाल्याबाबत मंडळ अधिकारी प्रशांत मसुरकर यांच्याकडे तक्रार दाखल केली.

दरम्यान, जागेचे मालक अर्जुन गिरी गोस्वामी यांनी हा २७ गुंठे कमर्शियल प्लॉट ३ महिन्यांपूर्वी पैसे भरून रीतसर व कायदेशीर कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरच खरेदी केल्याचे स्पष्ट केले असून तिथे कमर्शियल हॉल बनवण्यात येणार असल्याचे सांगितले.

‘उद्योगांसाठी जमीन दिली, मंगल कार्यालयासाठी नव्हे’

एमआयडीसीच्या स्थापनेच्या वेळी स्थानिक जमीनमालकांकडून जमीन हस्तांतरित करताना प्रति गुंठा ४२ रुपये मोबदला देण्यात आला होता. या जमिनीवर उद्योग आणि कारखाने उभे राहतील, या अपेक्षेने स्थानिकांनी आपल्या जमिनी दिल्या. मात्र, त्याच जमिनीचा वापर मंगल कार्यालय आणि मंदिरासाठी होत असेल, तर त्याला स्थानिकांचा विरोध राहील, अशी भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, संबंधित भूखंडावर ४ सप्टेंबर रोजी भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. हा कार्यक्रम झाल्यास तो उधळून लावण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे या भूखंडाच्या मुद्द्यावरून आगामी काळात संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.
यावेळी एमआयडीसीचे रत्नागिरी एरिया मॅनेजर संजय कसबे, मंडळ अधिकारी प्रशांत मसुरकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, विजय प्रभू, शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर, अतुल बंगे, योगेश धुरी, सुशील चिंदरकर, अमित राणे, गुरु गडकर, अजित मार्गी, प्रभाकर गावडे, दीपक गावडे, रामा कांबळी, स्वप्निल गावडे, महेश गावडे, केदार गावडे, भूषण गावडे, कृष्णा मराठे, राजन धोंड, विनय गावडे, बाबी आळवे, श्रीधर कोरजुवेलर, प्रथमेश गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
error: Content is protected !!