कुडाळात शिवसेनेच्या गणेश सजावट स्पर्धेची रंगत

प्रथम क्रमांकासाठी १५ हजारांचे बक्षीस
शहर मर्यादित स्पर्धेचे आयोजन; १० सप्टेंबरपर्यंत नावनोंदणीची अंतिम मुदत
आमदार निलेश राणे पुरस्कृत तसेच शिवसेना नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविका यांच्या वतीने कुडाळ शहर मर्यादित गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १० सप्टेंबर २०२६ पर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन गटनेते विलास कुडाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, शहरातील उत्कृष्ट गणेश सजावटीला प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. शहरस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाला १५ हजार रुपये, चषक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला १० हजार रुपये, चषक व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकाला ५ हजार रुपये, चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
याशिवाय प्रभागनिहाय स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ३ हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी २ हजार रुपये व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकासाठी १ हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रासह वृक्ष भेट देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्यासाठी युवासेना शहरप्रमुख आबा धडाम (७२१८०१६८६८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ सप्टेंबर २०२६ पासून स्पर्धेचे परीक्षण सुरू करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवातील सजावटीला कलात्मकतेची जोड देतानाच पर्यावरणपूरक सजावटीला प्रोत्साहन देण्याचा या स्पर्धेचा उद्देश असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.






