गणेशोत्सवापूर्वी कुडाळच्या खड्ड्यांवरून प्रशासनाला दणका !

नगरसेवक, नागरिकांचा PWD कार्यालयात तब्बल ४ तास ठिय्या

उद्यापासून युद्धपातळीवर रस्ते दुरुस्तीचे लेखी आश्वासन

गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही कुडाळ शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, रखडलेली दुरुस्ती आणि रस्त्यांच्या निकृष्ट कामांमुळे नागरिकांसह चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या संथ कारभाराविरोधात संतप्त होत नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यालयात तब्बल चार तास ठिय्या आंदोलन केले.
रस्त्यांच्या दुरवस्थेचा जाब विचारण्यासाठी नगरसेवक अभिषेक गावडे, विलास कुडाळकर, गणेश भोगटे, आबा धडाम, चेतन पडते, प्रथमेश केळबाईकर, बाबा तेली, चंदन कांबळी, राजवीर पाटील यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक PWD कार्यालयात दाखल झाले. मात्र, संबंधित अधिकारी पिसाळ कार्यालयात उपस्थित नसल्याने आंदोलकांमध्ये नाराजी वाढली. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता अधिकाऱ्यांसोबत बैठक निश्चित करण्यात आली.
या बैठकीत कार्यालयातील हालचाल नोंदवही, बायोमेट्रिक उपस्थिती तसेच शहरातील रस्ते दुरुस्तीच्या प्रश्नांवरून अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. केवळ कार्यालयात बसून कागदी चर्चा न करता नगरसेवक व नागरिकांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग ते कविलकट्टा रस्त्यावर नेले. या ठिकाणी असलेल्या खड्ड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यांची बिकट अवस्था अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
रस्त्यावर वारंवार खड्डे पडत असताना कायमस्वरूपी उपाययोजना न करता केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार असल्याचेही आंदोलकांनी स्पष्ट केले. “झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन गरजेचे होते,” अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
तब्बल चार तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पिसाळ यांच्या वतीने १ सप्टेंबरपासून खड्डे बुजविण्याचे व रस्ते दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, आता प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत उतरते आणि १ सप्टेंबरपासून रस्ते दुरुस्तीला खरोखर सुरुवात होते का, याकडे कुडाळवासीयांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!