‘नारळ लढवणे’च्या स्पर्धेत मयंक राऊत बाजीगर

नेरूरमध्ये रुपेश पावसकर व ‘रणझुंजार’ आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
साईराज मांजरेकर उपविजेता
रणझुंजार मित्र मंडळ, नेरूर आणि जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘नारळ लढवणे’ स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला ग्रामस्थ, नागरिक तसेच खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे विजेतेपद मयंक राऊळ याने पटकावले तर साईराज मांजरेकर उपविजेता ठरला.
यावेळी बोलताना माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे म्हणाले की, रुपेश पावसकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी गतवर्षी ‘नारळ लढवणे’ स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत ‘नारळ’ हेच त्यांचे निवडणूक चिन्ह होते आणि त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. यंदा या स्पर्धेचे दुसरे वर्ष असून, या माध्यमातून स्थानिक कलाकार व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम पावसकर यांनी केले आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही ते सातत्याने मदतीचा हात देत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर म्हणाले की, “नेरूर ही कलाकारांची भूमी आणि कला-संस्कृतीचे माहेरघर आहे. येथील अनेक दिग्गज कलाकारांनी नेरूरचे नाव सातासमुद्रापार पोहोचविले आहे. कोकणच्या दशावतार लोककलेत नेरूरचे मोठे योगदान आहे. येथील कलाकार आणि खेळाडूंना प्रकाशझोतात आणण्यासाठी तसेच सांस्कृतिक क्षेत्राला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.”
स्पर्धेचा निकाल – प्रथम क्रमांक : मयंक राऊत (चेंदवण) — रोख ६,६६६ रुपये व चषक. हा चषक कै. तारामती गोपाळ सडवेलकर यांच्या स्मरणार्थ सडवेलकर बंधूंनी पुरस्कृत केला. द्वितीय क्रमांक : साईराज मांजरेकर — रोख ३,३३३ रुपये व चषक. हा चषक वृशांक प्रकाश हळदणकर यांनी पुरस्कृत केला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, पंचायत समिती सदस्या दीप्ती नाईक, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक पावसकर, बाळा पावसकर, ग्रामपंचायत सदस्य समीर उर्फ शंभूराज नाईक, प्रवीण नेरुरकर, राजन नेरुरकर, उमेश परब, शिवाजी नेरुरकर, सिद्धेश कलीगणं, मंगेश बांदेकर, शेखर गावडे, रामा कांबळी, विनायक मालवणकर, प्रभाकर शृंगारे, अमोल शृंगारे, किशोर पिंगुळकर, रुपेश सावंत, सुधीर नेरुरकर, कल्पेश मार्गी, हाजीम मुजावर, कृष्णा उर्फ गोट्या पाटकर, संतोष परब यांच्यासह अनेक ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सुनील करवडकर यांनी केले.






