पणदूरमध्ये अंबरग्रीस तस्करीचा पर्दाफाश

एलसीबीचा सापळा ; चौघे ताब्यात

२.३७३ किलोग्रॅम अंबरग्रीससह २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

व्हेल माशाच्या उलटीपासून (अंबरग्रीस) तयार होणाऱ्या पदार्थाच्या तस्करीचा डाव सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) उधळून लावला. मुंबई-गोवा महामार्गालगत कुडाळ तालुक्यातील पणदूर परिसरात अंबरग्रीसची तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना एलसीबीच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांना अटक करण्यात आली असून कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत २ किलो ३७३ ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत २ कोटी ३७ लाख ३० हजार रुपये आहे. तस्करीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल आणि कारसह एकूण २ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई शनिवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी उशिरा करण्यात आली. याप्रकरणी चौघांविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एलसीबीचे पथक पेट्रोलिंग करीत असताना काही व्यक्ती प्रतिबंधित अंबरग्रीसची तस्करी करणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन पोलिसांनी दोन पंच, वजनकाटाधारक आणि वनरक्षक यांच्या उपस्थितीत पणदूर-कडावल रस्त्यालगत सापळा रचला.
दरम्यान, काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल आणि ग्रे रंगाची मारुती सुझुकी एर्टिगा या दोन वाहनांतून आलेल्या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून झडती घेतली असता विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले २ किलो ३७३ ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस आढळून आले.
या प्रकरणी संकेत संतोष चव्हाण (२६, रा. रवळनाथनगर, ओरोस, मूळ रा. निरूखे), महेश लक्ष्मण रेवणकर (३५, सध्या रा. कुवारबांव, रत्नागिरी, मूळ रा. रेवंडी, मालवण), अमेय पुंडलिक देसाई (३१, रा. रवळनाथनगर, ओरोस) आणि अमित अरुण अणावकर (३९, रा. अणाव, कुडाळ) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पंचनामा करून अंबरग्रीस तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने असा एकूण २ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत एलसीबीचे अमर कांडर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ मधील कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८ आणि ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोजा, आशीष जामदार आणि पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या कोट्यवधी रुपयांच्या कारवाईमुळे कुडाळ परिसरात खळबळ उडाली असून, अंबरग्रीस तस्करीच्या या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!