पिंगुळी भूपकरवाडीतील गणेशकोंडमधील मगर अखेर जेरबंद

वनविभागाची कार्यवाही
पिंगुळी-भूपकरवाडी येथील गणेशकोंडमध्ये आढळलेली भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या बचाव पथकाने आज दुपारी मोठ्या शिताफीने जेरबंद केली. काल दुपारपासून सुरू असलेले बचावकार्य आज दुपारी यशस्वी झाले. पकडण्यात आलेली मगर कुडाळ वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.
भूपकरवाडी येथील कृष्णा विश्वास चव्हाण या बालकाला सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गणेशकोंडच्या पाण्यात मगर दिसून आली. त्याने तत्काळ ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. काही क्षणांतच मगरीच्या दर्शनाची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली.
घटनेची माहिती मिळताच गोंधळपूरचे पोलीस पाटील शंकर सातार्डेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित यंत्रणांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. त्यानंतर ग्रामपंचायत सरपंच अजय आकेरकर, ग्रामपंचायत सदस्य आयाज खुल्ली आणि मंगेश चव्हाण यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. सरपंचांनी तातडीने संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून बचावकार्याची आवश्यक व्यवस्था केली.
यानंतर वनविभाग सावंतवाडीचे जलद कृती दल (रेस्क्यू टीम), एमआयडीसी अग्निशामक सेवा, कुडाळ नगरपंचायतीची अग्निशामक सेवा तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनीही बचाव पथकाला पूर्ण सहकार्य केले. रात्री उशिरापर्यंत मगरीला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, पाण्याची पातळी वाढल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले.
आज सकाळपासून पुन्हा बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. अखेर दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास वनविभागाच्या जलद कृती दलाने जाळीच्या सहाय्याने मगरीला यशस्वीरीत्या जेरबंद केले. यावेळी वनविभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
मगर पकडण्यात आल्याची माहिती मिळताच ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मगरीला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.






