कुडाळ-मालवणची आरोग्य व्यवस्था डॉक्टरांविना व्हेंटिलेटरवर

आमदार निलेश राणे सुशेगाद असल्याचा मनसेचा आरोप
महिला बाल रुग्णालय व मालवण ग्रामीण रुग्णालयाची आमदारांनी ‘ऑन फिल्ड’ पाहणी करावी
विधानसभा अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्न पोटतिडकीने मांडणारे तसेच पर्यटन व उद्योगवाढीसाठी मंत्र्यांच्या दालनात भेटीगाठी घेणारे स्थानिक आमदार निलेश राणे यांनी कुडाळ-मालवणच्या आरोग्य व्यवस्थेकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचा आरोप किनळेकर यांनी केला आहे. त्याचप्रमाणे मालवण ग्रामीण रुग्णालयातही तज्ज्ञ प्रसूती डॉक्टरांची कमतरता असल्याने सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सामान्य असलेल्या नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रश्नावर विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनीही वेळोवेळी आवाज उठविला आहे. मात्र, शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर व तंत्रज्ञ उपलब्ध होण्याबाबत अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही, असा दावा किनळेकर यांनी केला.
जिल्ह्याच्या विकासासाठी मोठमोठ्या योजना आणि स्वप्ने मांडली जात असताना कुडाळ-मालवणमधील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी निगडित मूलभूत प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय तसेच मालवण ग्रामीण रुग्णालयाची प्रत्यक्ष ‘ऑन फिल्ड’ पाहणी करून तेथील डॉक्टर, तंत्रज्ञ आणि अन्य आरोग्य सुविधांची कमतरता दूर करण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घ्यावा. जनतेला भेडसावणाऱ्या या गंभीर आरोग्य प्रश्नावर त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन शासनाकडून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कुणाल किनळेकर यांनी केली आहे.






