जनतेच्या हिताचे निर्णय प्रत्यक्षात पोहोचविणारे मंत्री म्हणजे बावनकुळे : मंत्री नितेश राणे

‘महसूल पर्व’ उपक्रमाचा गौरव; सिंधुदुर्गात उद्योग, पर्यटन प्रकल्पांना महसूल विभागाचे भक्कम सहकार्य असल्याचे प्रतिपादन

बावनकुळे यांच्या कार्यशैलीतून आम्ही शिकतो; तरुण मंत्र्यांसाठी ते आदर्श : नितेश राणे

पालकमंत्री नितेश राणे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यपद्धतीचे जाहीरपणे कौतुक करत, महसूल विभागात त्यांनी उभारलेला पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार हा राज्यातील मंत्र्यांसाठी आदर्श असल्याचे गौरवोद्गार काढले. छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात स्वागतपर भाषण करताना त्यांनी महसूल बावनकुळे यांच्या कामाची प्रशंसा करताना आमच्यासारखे तरुण मंत्री बावनकुळे यांचा आदर्श घेऊन काम करत असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
ना. राणे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात काम करताना बावनकुळे यांच्या कार्यशैलीचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळाली. महसूल विभागाशी संबंधित प्रत्येक निर्णय केवळ मंत्रिमंडळात मंजूर करून घेणेच नव्हे, तर त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही त्यांचा कटाक्ष असतो. त्यामुळे जनतेच्या हिताचे निर्णय प्रत्यक्षात पोहोचविणाऱ्या मोजक्या मंत्र्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

‘महसूल पर्व’ या पुस्तकाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, क्यूआर कोडच्या माध्यमातून प्रत्येक निर्णय आणि कामाची माहिती जनतेसाठी उपलब्ध करून देत बावनकुळे यांनी प्रशासनात पारदर्शकतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. जनतेची खरी सेवा कशी करावी, याचे उत्तम उदाहरण म्हणजे बावनकुळे यांचे कार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग व पर्यटन प्रकल्प आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, त्यासाठी आवश्यक महसुली प्रक्रिया पूर्ण करण्यात बावनकुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचेही राणे यांनी सांगितले. देवगडमध्ये ताज समूहाचा प्रकल्प उभारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला त्यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा उल्लेख करत, हा तुझा नाही, माझाही ड्रीम प्रोजेक्ट आहे, असे बावनकुळे यांनी सांगितल्याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली.

भूमाफियांच्या मुद्द्यावर बोलताना राणे यांनी सिंधुदुर्गची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. जिल्ह्यातील जमीन व्यवहार कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने होत असून, रोजगारनिर्मितीसाठी उद्योगांना चालना देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात मोठे उद्योग उभारल्यास रोजगारासाठी मुंबई, पुणे किंवा इतर शहरांकडे गेलेले तरुण पुन्हा आपल्या गावात परत येतील आणि स्थानिक पातळीवरच चांगल्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री नितेश राणे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, त्यांच्यासोबत आलेल्या महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तसेच जिल्हाधिकारी, महसूल प्रशासन आणि संपूर्ण यंत्रणेचे यशस्वी आयोजनाबद्दल विशेष कौतुक करून सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!