वाचनालय कर्मचाऱ्यांच्या पाठीशी वाचनप्रेमी वेतनश्रेणी लागू करण्यासाठी आवाज उठविणार

वाचन संस्कृती वाढविण्यासाठी अपु-या मानधनावर काम करणा-या वाचनालय कर्मचाऱ्यांना निदान चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणी लागू करावी किंवा मानधनात तरी वाढ करावी यादृष्टीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाचन प्रेमी वाचनालय कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आवाज उठविण्याचा महत्वपूर्ण निर्णय श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय आचराच्या 132व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थितांमधून घेण्यात आला. यावेळी या बाबत पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडण्याचे ठरविण्यात आले.
रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा उपाध्यक्ष अशोक कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी,समिती सदस्य जयप्रकाश परूळेकर, श्रीमती वैशाली सांबारी,विरेंद्र पुजारे,सौ दिपाली कावले, साहित्यिक सुरेश ठाकूर,वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन मंदार सांबारी, जनता विद्यामंदिर त्रिंबक संस्था अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ,ग्रंथपाल सौ विनिता कांबळी,आचरा माजी उपसरपंच पाडूरंग वायंगणकर,सांस्कृतिक समिती सदस्य राजा जोशी, वाचनप्रेमी मंदार सरजोशी,उज्वला सरजोशी,रघुनाथ पाटील,हडकर यांसह बहुसंख्येने वाचन प्रेमी उपस्थित होते.
सभेची सुरुवात राज्य गीताने झाली.यानंतर विद्यार्थी गुणगौरव यासह नियमित कामकाजा नंतर वाचनालय वेळेबाबत सौ जोशी यांनी उपस्थित प्रश्नाबाबत आपले मत व्यक्त करताना ग्रंथपाल विनिता कांबळी यांनी वाचनालय कर्मचारी अपु-या मानधनावर काम करत वाचन संस्कृती वाढविण्यासाठी योगदान देत आहेत. सध्याच्या महागाईत यावर गुजरान करणे कठिण आहे. याबाबत गेली पंधरा वर्षे ग्रंथालय कर्मचारी चतुर्थ श्रेणी लागू करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले. यावर उपस्थित वाचनप्रेमीकडून ग्रंथालय कर्मचा-यांच्या या मागणीला पाठींबा दर्शवीत त्यांच्या लढ्यात भाग घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.यावेळी बोलताना सुरेश ठाकूर यांनी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असून त्यांच्या मागणीच्या पुर्ततेसाठी वाचन प्रेमींनी एक होऊन त्यांच्या लढ्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्रिंबक वाचनालयाचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांनी आपण एका ग्रंथालयाचा अध्यक्ष असल्याने त्यांच्या व्यथा आपणास माहीत असल्याचे सांगितले.यावेळी उपस्थित सर्वांनी ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवित ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी शासन दरबारी आवाज उठविण्याचे ठरविण्यात आले. तसेच पालक मंत्री नितेश राणे,आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधण्याचेही ठरविण्यात आले.






