दातृत्वाच्या भूमिकेमधून तुम्ही लोकांपर्यंत चांगले विचार पोहोचविण्याची संधी चुकवू नका!

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अर्जुन राणे यांचे प्रतिपादन
डॉ. स्वप्निल राणे यांच्या माध्यमातून साकेडी शाळेतील विद्यार्थ्यांना सायकल व शैक्षणिक साहित्याचे वाटप
आपल्या मनामध्ये चांगले विचार बाळगा त्याची पूर्तता होत असते. डॉ. स्वप्निल राणे यांनी आज या विद्यार्थ्यांना सायकल, शैक्षणिक साहित्य दिले हा त्यांनी आपण शिकून मोठे झाल्यावर आपल्या शाळेप्रती ऋण व्यक्त करण्याकरिता केलेले छोटेसे कार्य आहे. भविष्यात शिकून मोठे झाल्यावर पुढील पिढीसाठी अशाच प्रकारे दातृत्वाची भूमिका विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. यातून तुमचे चांगले विचार लोकांपर्यंत नेता येतात व गरजूंना देखील मदत होते. असे उद्गार सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राणे यांनी काढले. कणकवली तालुक्यातील साकेडी सरस्वती विद्या मंदिर शाळा नंबर 1 या ठिकाणी डॉ. स्वप्नील राणे यांच्यामार्फत 2 विद्यार्थ्यांना सायकल, वह्या, कंपास, चित्रकलेकरिता रंगाचे संच असे शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले या प्रसंगी श्री राणे बोलत होते. करंजे येथे वस्तीला असलेल्या कातकरी समाजातील 2 विद्यार्थ्याना तसेच शाळेपासून तीन किलोमीटरवर असणाऱ्या वाघोपेवाडी येथील एका विद्यार्थ्याला या शाळेत येण्यासाठी डॉ. स्वप्निल राणे यांच्या माध्यमातून दोन सायकल देण्यात आल्या. या कार्यक्रमाच्याप्रसंगी कणकवलीतील प्रतिथयश दंतचिकित्सक डॉ. स्वप्नील राणे, सरपंच सुरेश साटम, ग्रामपंचायत व शाळाव्यवस्थापन सदस्य दिगंबर वालावलकर, केंद्रप्रमुख शिवाजी पवार, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अक्षता राणे, शिक्षक समिधा वारंग, उमेश मोरे, दीक्षा सावंत, दिलीप राणे, शामसुंदर राणे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. स्वप्नील राणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये व आपल्या घरी देखील शिस्तीचे पालन केले पाहिजे. मी या सायकल देत असताना यामागील माझा उद्देश लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांनी शाळेत वेळीच पोहोचणे व शिक्षण घेताना त्याकरता दुर्लक्ष होऊ नये याकरिता तुम्हाला हे प्रोत्साहन म्हणून सायकल दिली आहे. सायकल चालवत असताना सुरक्षिततेची देखील काळजी घ्या. स्पर्धा शिक्षणा मध्ये करा सायकल चालवताना नको असा सल्ला देखील त्यांनी दिला. यापुढे देखील शिष्यवृत्ती मध्ये शाळेमध्ये पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला मी सायकल देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यानंतर पण शाळेला विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोणतीही मदत असू दे मला हाक द्या मी सदैव माझ्या गावातील या शाळेसाठी तत्पर असेन असे उद्गार त्यांनी काढले. यावेळी मुख्याध्यापक प्रभाकर पावसकर यांनी डॉ. स्वप्नील राणे यांनी शाळेसाठी व विविध स्पर्धा परीक्षांना दिलेल्या बक्षिसे व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता राबविलेल्या उपक्रमांबाबत माहिती दिली. उपस्थित आणि शाळेच्या वतीने डॉ. स्वप्नील राणे यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर पावसकर यांनी केले.






