समुदायात बाल संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी पुण्यात समुदाय आधारित किशोर अनुकूल आरोग्य केंद्राचे उद्घाटन

किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य, बालसंरक्षण यांमधे समुदायाचा सहभाग अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT) यांच्या ‘सक्षम – समुदाय-आधारित सर्वसमावेशक बालसंरक्षण (CCLCP)’ उपक्रमांतर्गत, बजाज फिनसर्व्ह यांच्या सहकार्याने पुण्यातील मंगळवार पेठ येथे समुदाय-आधारित किशोर अनुकूल आरोग्य केंद्र (Adolescent Friendly Health Corner – AFHC) सुरू करण्यात आले.

या आरोग्य केंद्राचे उद्घाटन श्रीमती शेफाली बजाज, श्री कुरुश इराणी तसेच बजाज फिनसर्व्हच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला शासकीय अधिकारी, स्थानिक समुदायाचे प्रतिनिधी, किशोर-किशोरी तसेच CCDT च्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. सुकन्या पोद्दार उपस्थित होत्या.

नवीन आरोग्य केंद्रामार्फत किशोरवयीन मुलांना शारीरिक व मानसिक आरोग्य, पोषण, मासिक पाळी व्यवस्थापन, व्यसनमुक्तीबाबत जागरूकता, डिजिटल सुरक्षा, जीवनकौशल्ये आणि इतर आरोग्यविषयक बाबींवर समुपदेशन, मार्गदर्शन तसेच आवश्यक संदर्भ सेवा (Referral Services) सुरक्षित आणि सुलभ वातावरणात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

CCDT चा ‘सक्षम – Comprehensive Community Led Child Protection (CCLCP)’ हा उपक्रम समुदाय-आधारित बालसंरक्षणाच्या प्रभावी मॉडेलपैकी एक मानला जातो. पारंपरिक बालसंरक्षण व्यवस्थेत मुलांचे बचाव, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना यावर भर दिला जात असताना, हा उपक्रम मुलांना धोकादायक परिस्थितीत जाण्यापूर्वीच त्यांची असुरक्षितता कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतो. कुटुंबांना सक्षम करणे, समुदायाला सशक्त बनविणे आणि स्थानिक बालसंरक्षण यंत्रणा मजबूत करणे या माध्यमातून प्रत्येक मुलाला सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरणात वाढण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.

यावेळी बजाज फिनसर्व्हच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “बालसंरक्षण आणि किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण विकासात केलेली गुंतवणूक ही समाजाच्या उज्ज्वल भविष्याची गुंतवणूक आहे. CCDT सोबतच्या ‘सक्षम’ उपक्रमाद्वारे समुदाय-आधारित आणि शाश्वत उपाययोजनांना पाठबळ देताना आम्हाला अभिमान वाटतो. या माध्यमातून किशोरवयीन मुलांचे सक्षमीकरण, कुटुंबांचे बळकटीकरण आणि सुरक्षित समाजनिर्मितीस निश्चितच चालना मिळेल.”

यावेळी CCDT च्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, किशोरवयीन मुले ही केवळ योजनांची लाभार्थी नसून समाजपरिवर्तनाची भागीदार आहेत. त्यांना नेतृत्वाच्या संधी, निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे ही संस्थेची महत्त्वाची भूमिका आहे.
हा उपक्रम भारत सरकारच्या राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (Rashtriya Kishor Swasthya Karyakram – RKSK) शी सुसंगत असून, समुदाय, कुटुंब आणि शासन यांच्या संयुक्त सहभागातून अधिक सुरक्षित, निरोगी आणि सक्षम समाज घडविण्याच्या दिशेने हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!