शेतकरी सुविधा केंद्रामुळे शेतीला नवे बळ; आधुनिक यंत्रसामग्री व बाजारपेठेच्या सुविधा आता एकाच छताखाली

वनराई संस्था आणि एचडीएफसी बँक परिवर्तन प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने सुविधा उपलब्ध
ग्रामीण भागातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, दर्जेदार कृषी निविष्ठा आणि बाजारपेठेपर्यंत थेट पोहोच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वनराई संस्था आणि एचडीएफसी बँक परिवर्तन प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतकरी सुविधा केंद्र (Farmer Facility Centre – FFC)’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. आचरा आणि हिंदळे येथील कार्यालयाच्या माध्यमातून देवगड आणि मालवण तालुक्यातील १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांसाठी हे केंद्र कृषी विकासाचे सर्वसमावेशक सेवा केंद्र म्हणून कार्यरत आहे.यातूनच शेती अधिक आधुनिक, उत्पादक आणि शाश्वत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
देवगड व मालवण तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे लहान व अल्पभूधारक असून त्यांचा मुख्य व्यवसाय भात, भाजीपाला, कडधान्ये तसेच फळबागांची शेती हा आहे. मात्र वाढते मजुरी दर, कृषी मजुरांची टंचाई, आधुनिक कृषी यंत्रसामग्रीची महागाई, शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि उत्पादनाला योग्य बाजारभाव न मिळणे या समस्यांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या आव्हानांवर प्रभावी उपाय म्हणून शेतकरी सुविधा केंद्राची संकल्पना साकारण्यात आली आहे.
या केंद्रामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण आणि सुधारित शेती पद्धतींबाबत कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. तसेच दर्जेदार बियाणे, सेंद्रिय खते, मृदा परीक्षण, पीक नियोजन, रोग व कीड व्यवस्थापन, पीक विमा मार्गदर्शन, शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती, बाजारपेठ जोडणी, शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि हवामान बदलाशी सुसंगत शेती तंत्रज्ञानाचा प्रसार अशा विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने शेती करण्यास मोठी मदत होत आहे.
ग्रामीण भागात वाढती मजुरी आणि मजुरांची कमतरता ही शेतीसमोरील गंभीर समस्या बनली आहे. यामुळे शेतीची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने उत्पादनात घट होते. तसेच काढणीनंतर वर्गीकरण, साठवणूक आणि प्रक्रिया सुविधांच्या अभावामुळे अनेकदा शेतकऱ्यांना कमी दरात उत्पादन विकावे लागते. शेतकरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून या समस्यांवर प्रभावी उपाययोजना राबविल्या जात असून शेतकऱ्यांना उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत सर्वंकष सहाय्य मिळत आहे.
या उपक्रमामुळे शेतीचा उत्पादन खर्च १० ते १५ टक्क्यांनी कमी होण्याची, तर पीक उत्पादकतेत सुमारे २० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच बाजारपेठेशी थेट जोडणी निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक चांगला आणि योग्य दर मिळण्यास मदत होत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नात १५ ते २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पामुळे ग्रामीण युवकांसाठीही कृषी क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. कृषी सेवा, आधुनिक यंत्रसामग्री हाताळणी, तांत्रिक मार्गदर्शन आणि कृषी उद्योजकता यांसारख्या क्षेत्रांमध्ये युवकांना संधी उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर कमी करण्यासही या उपक्रमाची मदत होणार आहे.
शेतकरी सुविधा केंद्राचे व्यवस्थापन स्थानिक समुदायाच्या सहभागातून करण्यात येत असून विविध कृषी सेवा, सभासद शुल्क आणि इतर उपक्रमांच्या माध्यमातून केंद्र आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), शेतकरी हितगट (FIG) आणि महिला बचत गट (SHG) यांच्या सक्रिय सहभागातून केंद्राची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित केली जात आहे.
शेती अधिक आधुनिक, फायदेशीर आणि शाश्वत करण्याच्या दिशेने वनराई संस्था आणि एचडीएफसी बँक परिवर्तन प्रकल्पाचा हा उपक्रम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सामूहिक सेवा, बाजारपेठेशी जोडणी आणि तज्ज्ञ मार्गदर्शन यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे शेतकरी सुविधा केंद्र करत आहे.






