खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुकमध्ये वृक्षारोपण – खासदार नारायण राणे

प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रस्त्याच्या बाजूला विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी बोलताना खासदार नारायण राणे यांनी, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे. वृक्ष लागवड ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून त्यांचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, पंचायत समिती सदस्य दिव्या पेडणेकर, हरकुळ बुद्रुकचे सरपंच आनंद ठाकूर, उपसरपंच सौ. पटेल, कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अमेय ठाकूर, कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, कृषी विभाग व महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्यात आली. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.






