सिद्धार्थनगर स्मशानभूमी मधील मूलभूत सुविधा तातडीने द्या अन्यथा 15 ऑगस्ट रोजी उपोषण छेडणार

माजी नगरसेवक गौतम खुडकर यांचा नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना इशारा
अंत्यसंस्कार करताना होणाऱ्या समस्यांकडे वेधले लक्ष
कणकवली वॉर्ड क्रमांक ८ मधील सिद्धार्थनगर स्मशानभूमी ही अदयायावत व्हावी यासाठी अनेक वर्ष पाठपुरावा करून आज ही स्मशानभूमी अदयायावत झालेली आहे. बौद्ध समाजातील बांधवांचे अंत्यसंस्कार या स्मशानभूमीमध्ये केले जातात. गेली अनेक वर्ष या स्मशानभूमी मध्ये दहन करण्यासाठी लाकूड गोडवून शेड ची आवश्यकता होती. प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून गोडावून शेड मंजूर झाली व तिचे काम पूर्ण झाले. ४ महिन्यांचा काळ लोटला तरी अद्याप पर्यंत या गोडावून मध्ये लाकूड व्यवस्था नाही. त्यामुळे याबाबतची तातडीने व्यवस्था करा अन्यथा 15 ऑगस्ट रोजी नगरपंचायत समोर उपोषण छेडणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक गौतम खुडकर यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, गेल्या ३/४ महिन्यामध्ये ५ ते ६ जण मयत झालेले आहेत शेड पूर्ण झाल्यानंतर त्यात लाकूडव्यवस्था करणे हे संबंधित प्रशासनाचे काम आहे. लाकूड व्यवस्था नसल्याने सार्वजनिक स्मशान भूमी मधून लाकूड व्यवस्था करावी लागते. येण्या जाण्याचा वाहतूक खर्च हा गोरगरीब कुटुंबाला परवडणारा नाही. गेले अनेक महिने लाईट उपलब्ध नाही. रात्री अपरात्री अंत्यसंस्कार करायचे झाल्यावर लाईट नसल्यामुळे अंत्यसंस्कार करता येत नाहीत. बाजूला नदी असल्यामुळे स्मशानशेड खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे संरक्षण भिंत बांधणे आवश्यक आहे. लाकूड गोडावून शेड बांधून पूर्ण असताना देखील लाकूड व्यवस्था केली नाही तर येत्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही तर १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी मागासवर्गीय बांधवाना होणाऱ्या या गैरसोईबद्दल लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय लक्षवेध आंदोलन कणकवली नगरपंचायत समोर करण्यात येईल असा इशारा श्री खुडकर यांनी दिला आहे.






