‘त्या’ १४१ गुंठे जमिनीबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा नाही !

कुडाळ न.प. मुख्याधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

न्यायालये व न्यायप्राधिकारणांनी दिलेल्या आदेशाच्या आधारेच कार्यवाही

नगर पंचायत हद्दीतील ‘त्या’ १४१ गुंठे जमिन प्रकरणात नगरपंचायतीने उपलब्ध अभिलेख, कायदेशीर तरतुदी तसेच विविध न्यायालये व न्यायप्राधिकरणांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या आधारेच कार्यवाही केलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात नगरपंचायतीकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा अथवा मनमानी झालेली नसून सर्व निर्णय हे उपलब्ध कायदेशीर अभिलेख व न्यायालयीन आदेशांच्या अधीन राहून घेण्यात आलेले आहेत, असे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी स्पष्ट केले. कशा प्रकारे हे प्रकरण पुढे सरकले याचा लेखाजोखाच त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमांसमोर मांडला आहे.
श्री. औंधकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, मौजे कुडाळ येथील स.नं. 48, हि. नं. 5अ, 5 ब, 21 व स.नं. 49 हि.नं. 1 या जागेमध्ये मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी नियोजित रेखांकनास दि. 03/04/1993 रोजी निवासी वापराकरिता मंजुरी देण्यात आलेली होती. सदर रेखांकनामधील 141 गुंठे मोकळी जागा आपल्या ताब्यात ठेवण्यात नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप नगरसेविका संध्या तेरसे यांनी केला होता. याबाबत खुलासा खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.
श्री. महादेव तुकाराम आरेकर तर्फे कुलमुखत्यारी सौ. मनीषा महादेव आरेकर, रा. कुडाळ यांनी या कार्यालयाकडे नगरपंचायत हद्दीतील मौजे कुडाळ येथील स.नं. 48अ1अ/5अ2 या मिळकतीच्या आकारफोड पत्रकातील दुरुस्तीकरीता नाहरकत दाखला मिळणेबाबत अर्ज सादर केला होता. सदर अर्जावर निर्णय घेताना उपलब्ध अभिलेख तसेच विविध न्यायप्राधिकरणांनी दिलेल्या आदेशांचा विचार करण्यात आलेला आहे.

  1. कुळवाहिवाटी संदर्भात न्यायालयीन प्रकरण – संबंधित सर्व न्यायप्राधिकरणांनी महादेव तुकाराम आरेकर यांच्या बाजूने निर्णय दिलेले आहेत.
    मौजे कुडाळ येथील स.नं. 48, हि. नं. 5अ, 5 ब, 21 व स.नं. 49 हि.नं. 1 या जागेमध्ये मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी नियोजित रेखांकनास दि. 03/04/1993 रोजी निवासी वापराकरिता मंजुरी देण्यात आलेली होती. परंतु सदरील रेखांकनामधील खुल्या क्षेत्रापैकी 37 गुंठे इतक्या जागेवर महादेव तुकाराम आरेकर यांनी 2004 साली अप्पर तहसीलदार कुडाळ यांचेकडे स्वतःला ‘कुळ’ असल्याचा दावा सादर केला होता. सदर जागेसंदर्भात कुळ वहिवाटीबाबत तहसीलदार- कुडाळ, उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी तसेच महाराष्ट्र महसूल प्राधिकरण, मुंबई येथे विविध स्तरांवर प्रकरणे चालविण्यात आली. संबंधित सर्व न्यायप्राधिकरणांनी महादेव तुकाराम आरेकर यांच्या बाजूने निर्णय दिलेले आहेत.
  2. फेरफार क्र. 7790 रद्द करणेबाबत न्यायालयीन प्रकरण – तिन्ही न्यायप्राधिकरणांनी महादेव तुकाराम आरेकर यांच्या बाजूने आदेश पारित करून फेरफार नोंद क्र. 7790 रद्द करण्याचे निर्देश दिले.
    सदरील खुले क्षेत्र व अंतर्गत रस्ते हे मूळ मालक श्री. बाक्रे यांनी ग्रामपंचायत कुडाळ यांच्याकडे बक्षिसपत्र करून जागा हस्तांतरित केली होती. त्या अनुषंगाने करण्यात आलेली फेरफार नोंद रद्द करण्याबाबत महादेव तुकाराम आरेकर यांनी सरपंच, ग्रामपंचायत कुडाळ यांचे विरोधात अपिल दाखल केले. सदर अपील प्रकरणात उपविभागीय अधिकारी (महसूल), सावंतवाडी; अप्पर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग तसेच अप्पर आयुक्त, कोकण विभाग, मुंबई या तिन्ही प्राधिकरणांनी महादेव तुकाराम आरेकर यांच्या बाजूने आदेश पारित करून फेरफार नोंद क्र. 7790 रद्द करण्याचे निर्देश दिले.
  3. दावा मिळकतीच्या काब्जेसंदर्भात न्यायालयीन प्रकरण – नगरपंचायतने उच्च न्यायालय, मुंबई येथे अपील दाखल केले असता तो अपील फेटाळण्यात आला.
    सदर क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत मालकीचे पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात येत असल्याचे समजल्यावर महादेव आरेकर यांनी सरपंच व ग्रामसेवक, ग्रामपंचायत कुडाळ यांचे विरोधात दावा दाखल केला. सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), कुडाळ; जिल्हा न्यायालय, ओरोस यांनी सदर खुल्या क्षेत्रावर महादेव तुकाराम आरेकर यांचा शांततामय ताबा असल्याचे नमूद करून ग्रामपंचायत, कुडाळ यांच्या मार्फत कोणतीही हरकत/अडथळा निर्माण करू नये, असे आदेश दिलेले आहेत. तसेच नगरपंचायतने उच्च न्यायालय, मुंबई येथे अपील दाखल केले असता तो अपील फेटाळण्यात आला. सदर रेखांकनातील 141 गुंठे क्षेत्रफळ हस्तांतरणाचा फेरफार क्रमांक 7790 रद्द करून सदर क्षेत्र पुन्हा मूळ मालकांचे वारसदार व कुळ यांचे नावे झाले – दि. 14/11/1993 रोजी श्री. अरविंद गजानन बाक्रे यांनी सदर रेखांकनातील 141 गुंठे क्षेत्रफळाचे अंतर्गत रस्ते व खुले क्षेत्र हे अनरजिस्टर बक्षीसपत्राद्वारे सरपंच, ग्रामपंचायत कुडाळ यांच्या नावे हस्तांतरित केली, त्याची नोंद फेरफार क्रमांक 7790 अन्वये महसूल अभिलेखात घेण्यात आली होती. तथापि फेरफार क्रमांक 7790 हा दिनांक 07/07/2009 रोजी रद्द करण्यात आल्याने संबंधित क्षेत्राची नोंद पुन्हा मूळ मालकांच्या वारसदार श्रीमती शुभदा रमेश कुलकर्णी वैगेरे व कुळ महादेव आरेकर यांच्या नावे करण्यात आली.
    तहसीलदार यांचे आदेशानुसार महादेव आरेकर हे कुळ असल्याचे निश्चित करून सदर मिळकतीचे 2 पोटहिस्से करण्यात आले – त्यानंतर, मा. तहसीलदार, कुडाळ यांनी दिनांक 18/01/2017 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार श्री. महादेव तुकाराम आरेकर हे क्षेत्रफळ 0.37.00 हे.आर. चे कायदेशीर कुळ असल्याचे निश्चित करण्यात आले. सदर आदेशाच्या अनुषंगाने दिनांक 24/11/2017 रोजी स.नं. 48, हि.नं. 5अ या मिळकतीचे स.नं. 48अ1अ/5अ1 व स.नं. 48अ1अ/5अ2 असे दोन पोटहिस्से तयार करण्यात आले.
    सद्यस्थितीत स.नं. 48अ1अ/5अ1 या मिळकतीचे क्षेत्रफळ 1.04.41 हे.आर. चौ.मी. असून सदर क्षेत्रामध्ये अंतर्गत रस्ते व खुले क्षेत्र समाविष्ट आहे. 7/12 उताऱ्यावर सदर जमीन मूळ मालकांच्या वारसदार श्रीमती शुभदा रमेश कुलकर्णी व इतर यांच्या नावे नोंद असली, तरी प्रत्यक्षात सदर क्षेत्र कुडाळ नगरपंचायतीच्या ताब्यात आहे. तसेच या क्षेत्रामध्ये उपलब्ध कागदपत्रानुसार 2019 पासून अंतर्गत रस्ते, गटारे, पथदिवे आदी मूलभूत विकासकामे नगरपंचायतीमार्फत करण्यात आली असून त्यासाठी सुमारे रु. 2 कोटी 60 लाख इतका खर्च करण्यात आलेला आहे.
    तसेच, श्री. महादेव आरेकर यांच्या नावे असलेल्या स.नं. 48अ1अ/5अ2 या क्षेत्रफळ 00.37.00 हे.आर. चौ.मी. जागेसंदर्भात सन 2004 ते 2024 या कालावधीत विविध न्यायालयीन प्रकरणांकरिता तत्कालीन ग्रामपंचायत व नगरपंचायतीकडून वेळोवेळी खर्च करण्यात आलेला आहे. यामध्ये सन 2017 व 2018 मध्ये उपविभागीय अधिकारी यांच्यासमोरील दाव्यांच्या कामकाजासाठी ॲड. संदेश कृष्ण तायशेटे यांना एकूण रु. 30,000/- अदा करण्यात आले आहेत.
    वरील सर्व बाबींच्या आधारे, संबंधित प्रकरणात नगरपंचायतीने उपलब्ध अभिलेख, कायदेशीर तरतुदी तसेच विविध न्यायालये व न्यायप्राधिकरणांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या आधारेच कार्यवाही केलेली आहे. त्यामुळे सदर प्रकरणात नगरपंचायतीकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा अथवा मनमानी झालेली नसून सर्व निर्णय हे उपलब्ध कायदेशीर अभिलेख व न्यायालयीन आदेशांच्या अधीन राहून घेण्यात आलेले आहेत. असे मुख्याधिकारी श्री. विनायक औंधकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
error: Content is protected !!