शिक्षकां बाबत बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या प्रांताधिकाऱ्यांच्या बदलीची पालकमंत्र्यांची ग्वाही!

राज्य सरकारी व निम सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आली पालकमंत्र्यांची भेट
देवगड येथे बीएलओ प्रशिक्षणादरम्यान कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी कर्मचाऱ्यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी समन्वय समिती, सिंधुदुर्गच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील तब्बल २६ कर्मचारी संघटना एकवटल्या. या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाशी कणकवली येथे सविस्तर चर्चा केली. सकारात्मक तोडगा निघाल्याने आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली.
बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कर्मचाऱ्यांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थारा नाही. अशा अधिकाऱ्यांची लवकरच उचलबांगडी होईल. हा माझा शब्द आहे.”
ते पुढे म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचारी आणि जनता हे माझे कुटुंब आहे. कर्मचाऱ्यांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. उद्धटपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही.”
यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर, राज्यनेते सखाराम सकपाळ, सचिव सत्यवान माळवे, नरसू रेडकर, वामन तर्फे, दिनेश म्हाडगुत, सुहास सावंत, संदीप कदम, राजू वजराटकर, जगदीश गोगटे, जयेंद्र चव्हाण, सचिन मदने, संदीप मिराशी, निकिता ठाकूर, सोमनाथ शेंगाळ, लक्ष्मण वळवी, सुशांत मर्गज, निलेश ठाकूर, टोनी म्हापसेकर, हनुमंत वाळके, सुभाष गावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे यांनी कर्मचारी संघटनांना आश्वस्त करत सांगितले की, भविष्यात कोणत्याही अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्यांचा अवमान झाल्यास कर्मचारी समन्वय समितीने थेट माझ्याशी संपर्क साधावा. “मला कोणत्याही अधिकाऱ्यापेक्षा कर्मचारी अधिक महत्त्वाचे आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या बदलीसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
तसेच, बीएलओ व एसआयआर हे राष्ट्रीय महत्त्वाचे काम असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करून ही कामे मुदतीत पूर्ण करावीत, असे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्र्यांनी दिलेल्या ठोस आश्वासनांवर समाधान व्यक्त करत समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर सर्व कर्मचारी बीएलओ व एसआयआरची कामे नियमितपणे पार पाडतील, असेही जाहीर करण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचारी संघटनांनी दाखविलेली अभूतपूर्व एकजूट हेच आंदोलनाच्या यशाचे प्रमुख कारण असल्याची भावना समन्वय समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, राज्यभरातील कर्मचारी संघटना तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व २६ कर्मचारी संघटना आणि कर्मचारी बांधवांचे सचिन मदने आभार मानले.






