रस्त्यावरचे वंचित जीवन जगणारी बालके ही उद्याचे आधारस्तंभ..…..ममता सिंधूताई सपकाळ

आजचे विद्यार्थी समाजाप्रती सजग आणि संवेदनशील..!

त्यांना समस्येची जाणीव करून देण्याची गरज….. निखिल कारखानीस, एनएसएस जिल्हा समन्वयक

माणसाला माणूस बनविण्याचे शिक्षण देणे, हे विश्वातील मानव मानवजाती समोरचं मोठ आव्हान..! प्राचार्य डॉ. किशन पवार, के जे सोमैया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स

जीवन आनंद संस्था व के जे सोमैया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स चे रस्त्यावरचे वंचित जीवन जगणाऱ्या बालकांसाठी राज्य स्तरीय परिषदेचे दमदार पाऊल

संदिप परब यांच्या संकल्पनेतून राज्य स्तरीय परिषदेचे सोमैया कॉलेजात यशस्वी आयोजन

आज रस्त्यावरचे वंचित जीवन जगणारी बालके हे उद्याचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्यासाठी आपण काही करू शकलो नाही तर निकोप समाजाचं स्वप्न बघण्याचा आपल्याला काही हक्क नाही. दुःख आणि यातनांनी पिडीत असलेल्या व्यक्तीचा प्रथम स्वीकार करणे आवश्यक असल्याचे आपण माई (सिंधुताई) कडून शिकल्याचे सांगून सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये सगळ्यांना जोडून घेणारा DNA असावा. आपण सगळे समाजाशी जोडलेली माणसं आहोत. असे प्रतिपादन ममता सिंधूताई सपकाळ यांनी केले. त्या जीवन आनंद संस्था आणि एन एस एस युनिट, के जे सोमैया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स आयोजित एकदिवसीय राज्य स्तरीय परिषदेत बोलत होत्या..

रस्त्यावरचे निराधार वंचित जीवन जगावे लागत असलेल्या बालकांचे रोजचे जगणे माणूस पणाचे व्हावे, त्यांना माणूस म्हणून सन्मानाने जगण्यासाठी हक्काचे मूलभूत शिक्षण, आरोग्य, संरक्षण, मनोरंजन, विकासाची संधी मिळावी. त्यांचे बालपण सुख शांतीचे आणि सर्व प्रकारच्या शोषणा पासून मुक्तीचे असावे. अशी उद्दिष्टे घेऊन विद्याविहार मुंबई येथील सोमैया महाविद्यालयात एन एस एस विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक यांच्या प्रमुख सहभागात आयोजित एकदिवसीय राज्य स्तरीय परिषद उत्स्फूर्तपणे संपन्न झाली. उपप्राचार्य डॉ. सत्यवान हानेगावे, JAS चे विश्वस्त नरेश चव्हाण, प्रज्ञा राणे, अरुणा जगीयासी हे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी ममताताई व निखिल कारखानीस यांना त्यांची सुंदर रेखाचित्रे (स्केच), स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ तर मान्यवरांना शाल, श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात आले..

एन एस एस चे जिल्हा समन्वयक निखिल कारखानीस यांनी एनएसएस विद्यार्थ्यां संबंधी बोलताना आजचे विद्यार्थी समाजाप्रती सजग आणि संवेदनशील असल्याचे सांगून त्यांना समस्येची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे म्हटले..

महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सद्य सामाजिक, शैक्षणिक आणि युद्धजन्य परिस्थितीत माणसाला माणूस बनविण्याचे शिक्षण देणे, हे विश्वातील मानव जाती समोरचं मोठ आव्हान असल्याचे म्हटले.

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच सोमैया महाविद्यालयात संपन्न झालेल्या या राज्य स्तरीय परिषदेत सोमैया कॉलेजचे विद्यार्थी, प्रोफेसर यांचेसह मुंबई महानगर प्रदेशातील 30 सामाजिक संस्थांच्या 65 प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या राज्य स्तरीय परिषदेद्वारे के जे सोमैया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स व जीवन आनंद संस्थेचे रस्त्यावरच्या वंचित जीवन जगणाऱ्या बालकांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने हे एक पहिले दमदार पाऊल पडले आहे..

   परिषदेत रस्त्यावर वंचित अवस्थेत कुटुंबासह राहणार्‍या बालकांच्या प्रतिकूल जीवनातील आव्हाने, शिक्षणाची कमतरता आणि ओळख कागदपत्र मिळविण्यातील अडचणी, रस्त्यावर जगणारी बालके, पोलीस आणि कायदे व्यवस्था या विषयांवर अनुक्रमे बाल हक्क चळवळीतील कार्यकर्ते संतोष शिंदे, मिलिंद बिडवई आणि विकास सावंत यांनी विषया चे प्रभावी सादरीकरण करून सकस चर्चा घडवून आणली. एन एस एस विद्यार्थी समूहाने रस्त्यावरील वंचित जीवन असलेल्या बांधवांच्या समस्या आणि आव्हाने यावर आधारित विषय अनुरूप पथनाट्य आणि PPT सादर केले..

जीवन आनंद संस्थेचे मार्गदर्शक श्रीनिवास सावंत यांनी परिषदेतील विषय चर्चेची सूत्र संचलनद्वारे चांगली गुंफण केली.

     परिषदेतील गटचर्चे वेळी CCDT संस्थेचे श्री. रामचंद्र अडसुळे यांनी  मांडलेल्या, "सद्यस्थितीत सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेत रस्त्यावर राहणाऱ्या (Street Children) मुलांची स्वतंत्र जनगणना होत नसल्याने अशा मुलांची अचूक संख्या उपलब्ध नाही. व त्यामुळे त्यांच्या संरक्षण, शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन हक्क जपणूकी प्रभावी नियोजन करणे कठीण होते." या मुद्द्याला अनुसरून परिषदेत चर्चा होऊन उपस्थित तज्ज्ञ व संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन महाराष्ट्र बाल हक्क आयोगाला निवेदन सादर करण्याचे ठरविण्यात आले. 

➡️ समारोप प्रसंगी सर्व सहभागी सदस्यांनी एकमताने ठरविले की ही परिषद केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता येथून पुढे प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करण्यात येईल.

➡️ रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करण्यासाठी आणि विविध संस्थांमधील समन्वय वाढविण्यासाठी एक समन्वय समिती (Coordination Committee) स्थापन करण्यात येईल.

➡️ ही समिती दर तीन महिन्यांनी (तिमाही) बैठक घेऊन रस्त्यावरील मुलांशी संबंधित ओळखलेल्या प्रमुख प्रश्नांवर काम करेल,आढावा घेईल तसेच आवश्यक पाठपुरावा करेल.

➡️ पुढील बैठकीमध्ये समितीची औपचारिक स्थापना करून तिची रचना, जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल.

➡️ ही समिती या मंचाचे नेतृत्व करत रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या हक्क व कल्याणासाठी संयुक्तपणे पुढाकार घेईल.
महाविद्यालयाचे एन एस एस कार्यक्रम अधिकारी अमोल भोसले व दीपाली तोरसकर, प्रा. रिद्धी जोशी, संदिप यादव यांचेसह जीवन आनंद संस्थेचे किसन चौरे, शैलेन्द्र कदम, संपदा सुर्वे, रामचंद्र राणे, राजीव परब यांची कार्यक्रम संयोजनात महत्वपूर्ण भूमिका राहिली.

error: Content is protected !!