पशुखाद्याच्या गोण्यांमागे लपवलेली तब्बल 48 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

पोलीस निरीक्षक श्री.तेजस नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई:68 लाखांचा मुद्देमाल जप्त
कणकवली/प्रतिनिधी. कणकवली पोलिसांनी पहाटेच्या सुमारास खारेपाटण चेकपोस्ट वर महामार्गावरून आयशर टेम्पो मधून वाहतूक केली जाणारी गोवा बनावटीची तब्बल 48 लाख रुपयांची दारू जप्त केली आहे.आयशर टेम्पो सहित तब्बल 68 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबत तिथे ड्युटीवर कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल सुनील निकम यांनी तक्रार दिली असून त्यानुसार संशयीतांच्या टेम्पो चालक व क्लिनर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आज शुक्रवारी खारेपाटण चेकपोस्टवर ड्युटी करिता असलेल्या पोलिसांनी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वाहनांची तपासणी सुरू असताना पोलीस कॉन्स्टेबल सुनील निकम यांना तिथून जात असलेल्या आयशर टेम्पो मधील माल संशयास्पद वाटल्याने याबाबतची माहिती खारेपाटण दूरक्षेत्राचे अंमलदार श्री.मिलिंद देसाई यांना देण्यात आली.श्री.मिलिंद देसाई यांनी मालाची खात्री केल्यानंतर तो गोवा बनावटीच्या दारूचा साठा असल्याचे निदर्शनास आले.पशुखाद्याच्या गोण्यांच्या मागे हा साठा लपवण्यात आला होता.यानंतर ही माहिती कणकवली पोलीस श्री.निरीक्षक तेजस नलावडे यांना कळविण्यात आली.या पकडलेल्या आयशर टेम्पोमधून सुमारे 48 लाख रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूचे 1,000 बॉक्स आढळून आले.तसेच 20 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो जप्त करण्यात आला.अशा प्रकारे एकूण 68 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.या प्रकरणी वाहन चालक अर्जिराम गुलाराम गोदारा (वय 24) व क्लीनर मुकेश खिमाराम पंडित (वय 29),दोघेही राजस्थान येथील रहिवासी,यांना ताब्यात घेण्यात आले असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.शेडगे करीत आहेत.






