कुडाळवासीयांचे नाट्यगृहाचे स्वप्न फेब्रुवारी २७ पर्यंत प्रत्यक्षात

आमदार निलेश राणेंकडून साडेतेरा कोटीचा निधी
त्रुटी दूर केल्याने नाटयकर्मींकडून समाधान व्यक्त
कुडाळ येथील मच्छिन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहाचे निधी अभावी रखडलेले काम आता लवकरच मार्गी लागणार आहे. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी या नाट्यगृहासाठी तब्बल साडेतेरा कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे लवकरच हे रखडलेले काम मार्गी लागून कुडाळवासीय रंगकर्मींसाठी पुढील ८-९ महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी २०२७ पर्यंत एक सुसज्ज नाट्यगृह सज्ज झालेलं असेल असा विश्वास रंगकर्मी आणि स्थापत्य अभियंता केदार सामंत यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा मुख्यालय तिथे नाट्यगृह या शासनाच्या धोरणानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीच नाट्यगृह ओरोस येथे मंजूर झालं होत. पण तत्कालीन आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून कुडाळ इथं उभारण्याचं ठरलं. त्याच कामही सुरु झालं. आणि एका टप्प्यावर येऊन हे काम रेंगाळल. गेली चार वर्ष हे काम रखडलं होत. भरत जाधव, प्रशांत दामले यांनी सुद्धा या नाट्यगृहाच काम सुरु असताना पाहणी करून नाटक सादर करण्यासाठी त्यात त्रुटी असल्याचं सांगितलं होत. भाजपचे ज्येट्ठ कार्यकर्ते आणि पत्रकार निलेश तेंडुलकर यांनी हि गोष्ट तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनाला आणली आणि नाट्यगृहच्या त्रुटी दूर करण्यासाठीचा कामाला थोडीशी गती मिळाली. त्यासाठी एक रंगकर्मी आणि स्थापत्य अभियंता असलेल्या केदार सामंत यांची राज्याच्या मुख्य वास्तुविशारद श्रीमती देशपांडे मॅडम यांच्याशी मिटिंग झाली. त्रुटी समजावून सांगण्यात आल्या. प्लॅन्स रिवाइज झाले आणि त्रुटी दूर करण्याच्या सूचना देशपांडे मॅडम यांनी दिल्या. पण गेल्या काही वर्षात निधी अभावी नाट्यगृहाच काम सुरु झालं नव्हतं.
मुळात नाट्यगृह हे प्रेक्षकांसाठी जेवढं महत्वाचं आहे तेवढंच नाटक सादर करणाऱ्या कलाकारांसाठी सुद्धा महत्वाचं आहे. या नाट्यगृहाचे जे काम झालं होत ते प्रेक्षकांच्या दृष्टीने फार उत्तम झालं होत. पण नाटक सादर करताना रंगमंचाची जी खोली काहीशी कमी होती. त्यामुळे नाटकाचा सेट लागण्यात अडचणी येणार होत्या. फारतर एकांकिका किंवा मंगल कार्यालय अशेच कार्यक्रम त्यामुळे होणार होते. म्हणून रंगमंचाची खोली ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता प्रेक्षकांची एक रांग जरी कमी झाली ‘तरी केवळ २२ सीट कमी होणार आहेत. पण तरीदेखील ६२० प्रेक्षक सामावून घेण्याची क्षमता या नाट्यगृहाची असणार आहे. आणि आता नाटक सादर करण्यात काही अडचणी येणार नाहीत. त्यामुळे रंगकर्मीमध्ये समाधानाचं वातावरण आहे.
गेली चार वर्ष रखडलेल्या नाट्यगृहाच्या कामाला आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे पाठबळ मिळाले. आमदार निलेश राणे यांनी स्वतः या कामात जातीनिशी लक्ष घालून नूतनीकरण कामासाठी साडेतेरा कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यापैकी पहिला १० कोटींचा हप्ता आलेला आहे. येत्या ८ ते ९ महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी २०२७ पर्यंत हे नाट्यगृह नाटक सादरीकरणासाठी तयार होईल असा विश्वास केदार सामंत यांनी व्यक्त केला.
कुडाळ हे सिंधुदुर्गचे महत्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे. अनेक कायर्क्रम इथं होत असतात. पण बंदिस्त नाट्यगृहाची उणीव होती. ती या मच्छिन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहाने भरून निघणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून आणि सहकार्यातून एक सुसज्ज नाट्यगृह येथील नाट्यरसिकांसाठी लवकरच उभे राहील यात कोणतीही शंका नाही.





