कणकवलीतील एस एम हायस्कूलच्या धोकादायक इमारती मुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका!

शाळा प्रशासन व संस्थाचालकांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

माजी विद्यार्थी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

कणकवली येथील एस. एम. हायस्कूलची मुख्य इमारत सध्या अत्यंत जीर्ण आणि मोडकळीस आलेली आहे. या शाळेत दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. इमारतीची सध्याची दुरवस्था पाहता एक माजी विद्यार्थी म्हणून दुःख होतं आहे. तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झालेला आहे, हजारो विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो. दुर्दैवाची बाब म्हणजे, या परिस्थितीचे गांभीर्य माहीत असूनही शाळा प्रशासन आणि संस्थाचालक याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा प्रकारची तक्रार कलमठ सरपंच तथा या शाळेचे माजी विद्यार्थी संदीप मेस्त्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या तक्रारी मध्ये पुढे म्हटले आहे, त्यांच्याकडून इमारत दुरुस्तीसाठी किंवा सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ठोस हालचाल होताना दिसत नाही.पावसाळा सुरू झाल्यावर अशा जीर्ण इमारती कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. हा निष्काळजीपणा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकतो. तरी, माझी आपणास नम्र विनंती आहे की, कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी आपण स्वतः किंवा आपल्या स्तरावरील पथकामार्फत एस. एम. हायस्कूल, कणकवली या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी (Inspection) करावी. स्ट्रक्चरल ऑडिट करावे, केले असेल तर त्याची प्रत उपलब्ध करून द्यावी. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा प्रशासनाला तात्काळ कडक आदेश देऊन योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करावी. याची मागणी या निवेदनाद्वारे श्री मेस्त्री यांनी केली आहे.

error: Content is protected !!