डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामांना मंजुरी

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रहास्तव सिंधुदुर्गला अनुसूचित जाती व नवबौद्ध वाडी वस्त्या साठी ८ कोटीचा निधी उपलब्ध
अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांहोणार प्रकाशमान
अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या वस्त्यांमध्ये निर्माण होणार मूलभूत सुविधा
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. १५६ कामासाठी ३९ कोटी ९६ लाख निधीस मंजुरी मिळाली असून ७ कोटी ९९ लाख २० हजार रुपयांचा विकास निधी उपलब्ध झाला आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, या निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमधील पायाभूत सुविधा आणि सामाजिक-सांस्कृतिक विकासाला चालना देणाऱ्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर कामांसाठी सुमारे ३९ कोटी ९६ लाख रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून आवश्यक विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत.
ही कामे सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत किंवा शासनाच्या अन्य संबंधित यंत्रणांमार्फत राबविण्यात येतील. कामांचे अंदाजपत्रक, आराखडे व तांत्रिक मान्यता घेऊनच निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
मंजूर निधीच्या मर्यादेतच कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांवर आहे.





