सा.बां. विभागाचे अधिकारीच ठेकेदारी करत असल्याचा लोकांच्या तक्रारी !

कुडाळ पं. स. मासिक सभेत सभापती-उपसभापतींनी वेधले लक्ष
सा.बां. विभागाच्या प्रत्येक कामाची सदस्य करणार पाहणी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आज झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत सभागृहाने धारेवर धरले. सार्वजनिक बांधकाम विभागाची एकाधिकारशाही चाललेली असून हि कामे ठेकेदारांऐवजी अधिकारीच करताहेत अशा लोकांच्या तक्रारी असल्याचे सभापती आणि उपसभापती यांनी स्पष्ट करून इतर सदस्यांनी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या कामांची सदस्य पाहणी करतील असे सभापती मिलिंद नाईक यांनी स्पष्ट केले. या बरोबरच महावितरणचे स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारकच आहे असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट करून स्मार्ट मीटर कसे उपयुक्त आहेत त्याचे समर्थन केले.
कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा आज छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभापती मिलिंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उप सभापती सीताराम तेली, गट विकास अधिकारी मनोज भोगटे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर व्यासपीठावर उपस्थित होते. विविध विभागांचा आढावा घ्यायला सुरूवात झाल्यानंतर जेव्हा कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी त्या विभागाचे सक्षम अधिकारी न येता दुय्यम दर्जाचे अधिकारी उत्तरे द्यायला आल्यावर सभागृहाने सक्षम अधिकारी आल्याशिवाय आम्ही प्रश्न मांडणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनतर काही वेळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे सक्षम अधिकारी सभागृहात हजर झाल्यावर सदस्यांनी त्यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती केली. सदस्य मंगेश प्रभू यांनी माड्याचीवाडी येथील रस्त्यावर असलेल्या पोलीस चेकपोस्टचा विषय मांडला. गेल्या सर्व सभांमधून हा विषय मांडला तरी तो चेकपोस्ट हलवला गेलेला नाही हे त्यांनी सा.बां. विभागाच्या अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिले. त्यावर पोलीस विभाला सात दिवसांची नोटीस दिली जाईल आणि त्यांनतर सुद्धा चेकपोस्ट हलवला नाही तर आम्ही कारवाई करू अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.
पिंगुळी- पाट रस्त्याबाबत सुद्धा जोरदार चर्चा सभागृहात झाली. या रस्त्यावर खर्चच झालेला नाही अशी माहिती सभागृहात देण्यात आली. फक्त गटार मारले आणि खड्डे बुजविण्यात आल्याचे सा.बां. अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर सदस्य मंगेश प्रभू यांनी मारलेली गटारे दाखवा असे अधिकाऱ्यांना आव्हान दिले. हीच चर्चा पुढे नेताना सभापती आणि उपसभापती यांनी तुम्हीच हि कामे करतात अशा लोकांच्या तक्रारी आहेत असे सा.बां. च्या अधिकाऱ्यांना सांगताच अधिकाऱ्यांनी त्याचा इन्कार केला. ज्या दहा कामांवर सभागृहात चर्चा होत होती त्या कामांची सा.बां. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाऊन पाहणी करूया असे सभापती मिलिंद नाईक यांनी सुचविले. तसेच त्याबाबत लवकरच सा.बां. विभागासोबत बैठक लावणार असल्याचे देखील सांगितले.
सा.बां. विभाग २५ टक्के बिलोने कामे करत असेल तर जो ठेकेदार आणि इंजिनियर ती कामे करतो त्यांचा आपण शासनचे पैसे वाचविल्याबद्दल सत्कार करूया, असे सभापती-उपसभापतींनी सांगितले. १० लाखाचे काम सात लाख रुपयांत कसं काय होऊ शकते असा सवालच काही सदस्यांनी उपस्थित केला. त्यामुळे सा.बां. विभागाबद्दल आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या एकाधिकारीशाहीबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची जाणीव त्या अधिकाऱ्यांना सभागृहाने करून दिली.
सा.बां. विभाग फक्त देखभाल दुरुस्तीची कामे करते. त्यांच्याकडे तो हेड आहे. पण जिल्हा परिषदकडे देखभाल दुरुस्ती हेड नाही. त्यातच सा.बां. विभाग हा निकृष्ट कारभार करत असल्याची माहिती सदस्यांनी सभागृहात दिली. रस्त्याची कामे निकृष्ट करून एखादा अपघात होण्याची त्यात कोणाचातरी जीव जाण्याची वाट सा.बां. विभाग बघतंय का, असा संतत्प सवाल सदस्य मंगेश प्रभू यांनी केला. आकेरी-वाडोस रस्त्यावर ११ लाख रुपये कुठे खर्च केले ते सांगा असे सदस्य योगेश धुरी यांनी विचारले. त्या त्या रस्त्यावर पाणी आले तर त्याच पाण्यात सा.बां. विभागाच्या सर्व अधिकाऱ्याना बसविणार असा इशाराच धरी. धुरी यांनी दिला. सदस्य बाळकृष्ण मडव यांनी देखील सा.बां. विभागाच्या कामावर नाराजी व्यक्त केली.
तर पुढच्या मीटिंगमध्ये पुन्हा प्रश्न विचारा !
एसटीच्या कारभाराबाबत चर्चा सुरु असताना योगेश धुरी यांनीं कांदुळी-मोरे भागात विद्यार्थ्यांसाठी बस फेरी सुरु करावी अशी मागणी मार्च महिन्यात केली तरी अजून बसफेरी सुरु झाली नसल्याची बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून त्यावर काय कार्यवाही झाली असा प्रश्न विचारला. त्यावर अधिकऱ्यानी कणकवली येथे पत्र पाठवले आहे असे सांगितले. त्या उत्तराने श्री. धुरी यांचे समाधान झाले नाही. त्यांनी तुम्ही काय केले असे विचारले. त्यावर सभापती मिलिंद नाईक यांनी सांगितले कि, अधिकाऱ्यांचे काम पत्र वरती पाठवणे असते. पुढचा पाठपुरावा आपण लोकप्रतिनिधींनी करायचा असतो. त्यावर श्री. धुरी म्हणाले कि तरी देखीळ काम झाले नाही तर काय करायचे ? त्यावर पुढच्या सभेत पुन्हा प्रश्न उपस्थित करायचा असे उत्तर सभापती मिलिंद नाईक यांनी श्री. धुरी याना दिले.
दरम्यान सदस्य करुणा पावसकर यांनी देखील पणदूर हायस्कुल मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसेस थांबवल्या जात नाहीत. चालक वाहक विद्यार्थ्यांशी सौजन्याने वागत नाहीत अशा तक्रारी एसटी अधिकऱ्यांच्या निदर्शनाला आणून दिल्या. कसाल बस स्टॅन्ड समोरचे खड्डे आणि बस स्थानकातल्या अस्वच्छतेबाबत सदस्य संतोष कांदळकर यांनी एसटीच्या अधिकऱ्यांचे लक्ष वेधले. सदस्य अर्चना घावनाळकर यांनी देखील बस उशिरा सुटतात याकडे लक्ष वेधले. बस वेळेवर सोडाव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ फुकट जाणार नाही अशी मागणी त्यांनी केली .त्यावर एसटीच्या अधिकाऱ्यांनी पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याचे नेहमीप्रमाणे सांगितले.
महावितरण विभागाबाबत सुद्धा लोकांच्या अनेक तक्रारी असल्याचे सदस्यांनी सांगितले. मंगेश प्रभू, योगेश धुरी, श्रावणी तेरसे, बाळकृष्ण मडव यांनी चर्चेत भाग घेतला. लाईट वारंवार जाते याकडे या सदस्यांनी लक्ष वेधले. भूमिगत वीज वाहिनीसाठी खोदलेले रस्ते त्वरित बुजवावेत अशी मागणी मंगेश प्रभू यांनी केली.
अंगणवाडीना पुरविलेले पोषण आहार साहित्य निकृष्ट
आंगणवाड्याना पुरविलेले पोषण आहार साहित्य दर्जाहीन असल्याकडे सदस्य सदस्य अर्चना घावनळकर यांनी आयसीडीएसच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. ते मान्य करून अधिकाऱ्यांनी हि बाब वरिष्ठाना कळविली असल्याचे सांगितले. त्यावर सभापतींनी फक्त वरिष्ठांना नको तर जे तो पोषण आहार वापरतात त्यांना देखील याची माहिती द्या अशी सूचना केली. तसेच काही अंगणवाडी कर्मचारी मुले घरी गेली कि अंगणवाडी बंद करून घरी जातात हा मुद्दा सुद्धा चर्चेला आला. त्यावर सभापती यांनी दुपारी २ वाजल्यानंतर अचानक भेट देण्याच्या सूचना दिल्या.
कसालच्या प्राथामिक आरोग्य केंद्राबाबत संतोष कादंळकर यांनी प्रश्न उपस्थित केला. जन आरोग्य समितीवर पंचायत समिती सदस्यांना स्थान द्यावे असा ठराव यावेळी सदस्य योगेश धुरी यांनी मांडला. कुडाळच्या महिला बाल रुग्णालयात अस्वच्छता असल्याने गर्भवती मातांची गैरसोय होत असल्याची बाब योगेश धुरी यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिली. त्यावर आपण लक्ष घालतो असे सभापती मिलिंद नाईक यांनी सांगितले.
रेन वॉटर हार्वेस्टिंग वर भर द्या !
रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत काय कार्यवाही केली आहे, असा प्रश्न सदस्य योगेश धुरी यांनी विचारला. त्यावर ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी यांनी श्री. धुरी यांचे हा प्रश्न विचारल्याबद्दल कौतुक केले. सध्या एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबला आहे. आणि कमी पाऊस पडणायची शक्यता आहे. त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे इतर कामांवर आणि विहिरींच्या जाळ्यावर खर्च करण्यापेक्षा भविष्याच्या दृष्टीने रेन वॉटर हार्वेस्टिंग वर आणि शोष खड्डे यावर खर्च करावा अशी सूचना अधिकाऱ्यांनी केली.
अतिरिक्त शिक्षक आणि पटसंख्या याबाबत सदस्य अमित भोगले यांनी चर्चा केली. विज्ञान प्रदर्शनाचा खर्च कधी मिळणार अशी विचारणा सदस्य दीप्ती नाईक यांनी केली. त्यावर लवकरच पैसे मिळतील असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले. घावनळे हरिजनवाडी येथिल शाळा इमारतिचे काम अर्धवट टाकून ठेकेदार गायब झाल्याचे सदस्य अर्चना घावनळकर यांनी सांगितले. शाळेचे सर्व साहित्य एकाच वर्गखोलीत ठेवल्याने गैरसोय होते आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ग्राम पंचायतच्या वर्षात चार तपासण्या व्हायला पाहिजे त्या होतात का असा प्रश्न सदस्य करुणा पावसकर यांनी विचारला. ज्याठिकाणी ग्रामसेवक पदे रिक्त आहेत त्याठिकाणची पदे लवकरात लवकर भरावीत अशा सूचना सभापती मिलिंद नाईक यांनी केल्या.
स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारकच !
आजच्या पंचायत समितीच्या सभेत महावितरणच्या वतीने स्मार्ट मीटर विषयक माहिती देण्यात आली. स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारकच असल्याचे महावितरणच्या स्मार्ट मीटर एजन्सीचे अधिकारी सुधाकर विडे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी बंधनकारक नसल्याचे जरी सांगितले असले तरी ते त्यांचे विधान प्रीपेड स्मार्ट मीटर बाबत होते असे श्री. विडे यांनी स्पष्ट करून स्मार्ट मीटर बसविण्याचे फायदे सभागृहात मांडले. ग्राहकाच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविले जात आहेत याकडे सदस्य योगेश धुरी यांनी लक्ष वेधले असता, ते चुकीचे असल्याचे श्री. विडे यांनी सांगितले.
सदस्य करुणा पावसकर यांची अभ्यासपूर्ण मांडणी कौतुकास्पद !
पंचायत समिती सभेत लोकांनी निवडून गेलेले सदस्य लोकांचे प्रश्न आणि समस्या मांडत असतात. पण कुडाळ पंचायत समितीमध्ये बहुतांश सदस्य नवीन असल्याने सभाशास्त्र आणि प्रश्न मांडण्यात काही सदस्य अजूनही कमी पडत आहेत. पण काही सदस्य आहेत जे प्रश्न मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचाच प्रत्यय आजच्या मासिक सभेत आला. पावशी मतदारसंघाच्या सदस्या करुणा पावसकर यांनी मांडायचे प्रश्न एका वहीत लिहून आणले होते आणि ते अत्यंत व्यवस्थितपणे आणि आत्मविश्वासाने यांनी मांडले. त्यावर चांगली चर्चा घडवून आणली.





