आंबोलीत ७०० धावपटूंची मान्सून दौड

चैतन्य रूपनर, साक्षी पवार यांची विजयी भरारी
प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्गचा संदेश
दाट धुके, मुसळधार पाऊस, बोचरी थंडी आणि हिरव्यागार सह्याद्रीच्या कुशीत आज सह्याद्री एडवेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली-सांगेली आणि सायकलिस्ट्स असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६” उत्साहात संपन्न झाली. निसर्ग आणि साहसी क्रीडा यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी राज्यासह परराज्यातील हजारो धावपटूंनी आंबोलीत हजेरी लावली. या तिसऱ्या भव्य आंबोली मान्सून मॅरेथॉनला यंदा विक्रमी प्रतिसाद मिळाला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबईसह गोवा, कर्नाटक आणि मंगळुरू येथून तब्बल ७०० हुन अधिक धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. मुसळधार पाऊस आणि दाट धुक्याच्या साक्षीने पार पडलेल्या या स्पर्धेत 21 किमी खुल्या पुरुष गटात सांगलीचा चैतन्य रूपनर आणि महिला गटात ठाण्याची साक्षी पवार, तर 10 किमी खुल्या पुरुष गटात सांगलीचा अनिकेत देशमुख आणि महिला गटात पुण्याची यामिनी ठाकरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे “प्लास्टिकमुक्त आंबोली, प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग” हा सामाजिक संदेश. सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी स्वतः 10 किमी धाव पूर्ण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब, सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुपचे अध्यक्ष बाबल अल्मेडा, उपाध्यक्ष उत्तम नार्वेकर, पंचायत समिती सदस्य मायकेल डिसुजा, सचिव संदेश गोसावी, सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर, कुडाळ सायकल क्लबचे रूपेश तेली व शिवप्रसाद राणे, सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती पंकज दळवी, आंबोलीच्या सरपंच सावित्री पालयेकर ,दिनेश गावडे निवेदक सचिन मदने ,झुम्बा सदस्य कृतिका कोरगावकर व प्रदिप्ती कोटकर ,उमेश गाळवणकर,डाॅ जी टी राणे ,पेमेंद्र पोरे ,प्रमोद भोगटे,डाॅ सिध्दार्थ परब ,अभिजीत परब ,डाॅ राजवर्धन देसाई ,रोटरी क्लब ऑफ कुडाळचे सचिव राकेश म्हाडदळकर,राजीव पवार ,अजिंक्य जामसंडेकर,ॲड सुप्रिया राणे ,ॲड सुहास सावंत,ॲड निलांगिणी रांगणेकर- सावंत, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील विविध वयोगटांतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच मॅरेथॉनचे ब्रँड ॲम्बेसेडर, सहकार्य करणाऱ्या संस्था, स्वयंसेवक आणि विविध टीमचा विशेष सत्कार करण्यात आला. सावंतवाडीचा अवघा 10 वर्षांचा कबीर हेरेकर याने महाराष्ट्र व गोव्यातील 68 मॅरेथॉन पूर्ण केल्याबद्दल त्याचाही विशेष सन्मान करण्यात आला. आंबोली मान्सून मॅराथाॅनमध्ये दै तरूण भारतचे पत्रकार प्रमोद ठाकूर आणि दै सकाळचे अजय सावंत यांनी सक्रिय सहभाग घेऊन स्पर्धा पूर्ण केली.
स्पर्धेचा निकाल
21 किमी खुलागट पुरूष प्रथम चैतन्य रूपनर (सांगली), द्वितीय अभिषेक देवकाते (कोल्हापूर), 21 किमी खुलागट महिला प्रथम साक्षी पवार (ठाणे), द्वितीय ममता पाटील (सांगली), 21 किमी 35 ते 45 वयोगट पुरूष प्रथम मल्लापा पुजारी (बेळगावी), द्वितीय नंदेश गावकर (गोवा), 21 किमी 45 ते 60 वयोगट पुरूष प्रथम सुनिल शिवणे ,द्वितीय अनंत तनकर,21 किमी 60 वर्षावरील पुरूष प्रथम उदय महाजन व द्वितीय विश्वनाथ शेटये (गोवा) ,21 किमी 35 ते 45 वयोगट महिला प्रथम नेत्रा सुतार (कोल्हापूर) आणि द्वितीय चित्रा सापळे (कणकवली), 21 किमी 45 ते 60 वयोगट महिला प्रथम पल्लवी मूग ,द्वितीय कविता जाधव (सिंधुदुर्ग), 10 किमी खुलागट पुरूष प्रथम अनिकेत देशमुख (सांगली),द्वितीय संकेत पाटील (कोल्हापूर), 10 किमी खुलागट महिला प्रथम यामिनी ठाकरे (पुणे),द्वितीय दिक्षा जाधव (सिंधुदुर्ग),10 किमी 35 ते 45 वयोगट पुरूष प्रथम शंकर मगदूम व द्वितीय जगदिश शिंदे ,10 किमी 45 ते 60 वयोगट पुरूष प्रथम इराप्पा नाईक ,द्वितीय पवनकुमार अराल्लीगीदाद,10 किमी 60 वर्षावरील पुरूष प्रथम सतिश गावंडळकर व द्वितीय सुरेंद्र,10 किमी 45 ते 60 वयोगट महिला प्रथम द्राक्षायनी मुरगुड,द्वितीय माधुरी शिवदे,10 किमी 35 ते 45 वयोगट महीला प्रथम शांती देसाई (कुडाळ),द्वितीय प्रिती मनीष (मेंगलोर),10 किमी 60 वर्षावरील महिला प्रथम डाॅ अमृता वेजरे (देवगड),द्वितीय मालन कंटक आदींनी यश संपादित केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी केएसआर ॲक्वेरियम केसरी, दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, विशाल सेवा फाऊंडेशन, संजू परब मित्रमंडळ, राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, डार्क फॉरेस्ट रिसॉर्ट, हॉटेल व्हिसलिंग वूड, हॉटेल दुर्वांकुर, सावंतवाडी पॅलेस, सिंधुदुर्ग जिल्हा बँक आदी सहप्रायोजकांचे मोलाचे सहकार्य लाभल.
विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांनी भविष्यात आंबोली मान्सून मॅरेथॉनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे धावपटू सहभागी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. तर सह्याद्री ॲडव्हेंचरचे मायकेल डिसोजा आणि सायकलिस्ट असोसिएशनचे गजानन कांदळगावकर यांनी, “सामूहिक प्रयत्नांमुळेच आंबोली मान्सून मॅरेथॉन सलग तिसऱ्या वर्षी यशस्वी ठरली असून, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचला,” अस नमूद केले.
जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधत विविध मैत्री समूहांनीही या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. जीवलग क्लासमेट ग्रुप, सखेसोबती मैत्री ग्रुप यांच्यासह अनेकांनी उत्साहाने धाव घेत वातावरण अधिक रंगतदार केले. मुसळधार पाऊस, धुक्याची दुलई आणि थंडगार वाऱ्यात सह्याद्रीच्या नयनरम्य घाटरस्त्यांवरून धावताना स्पर्धकांना एक अविस्मरणीय अनुभव मिळाला. आंबोलीच्या रम्य वातावरणामुळे आणि स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनामुळे सहभागी धावपटूंनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. क्रीडा आणि पर्यटनाला चालना देतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या स्पर्धेने आजच्या चोख आयोजनातून राज्यातकि एक प्रतिष्ठेची मान्सून मॅरेथॉन म्हणून ओळख निर्माण करून दिली आहे.






