विद्यार्थ्यांना तणावमुक्त शिक्षण द्या!

वर्षा सांबारी : आचरा केंद्रशाळा येथे पहिलीच्या विद्यार्थ्यांनी टाकले ‘ पहिले पाऊल

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत प्राथमिक शिक्षणाचा महत्वपूर्ण वाटा असतो. विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची रुची वाढवली पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन तणावमुक्त शिक्षण देणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य वर्षा सांबारी यांनी केले.

आचरा येथील कै. बा. ना. बिडये विद्यालय अर्थात केंद्रशाळा आचरे नं. १ येथे सोमवारी प्रवेशोत्सव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर, उपाध्यक्ष दिपाली कांबळी, शिक्षक शारदा बिसेन, दिपाली खंडगावकर, मीरा बांगर, सिद्धेश हळवे, पत्रकार सिद्धेश आचरेकर, महिला पोलिस स्वाती आचरेकर, विलास आचरेकर, संतोष मेस्त्री, सदाशिव पुजारे, निधी अपराज
आरोग्य सेवक प्रदीप शेवाळे, आशा सेविका प्रियंका राणे, प्रणिका आचरेकर, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते. प्रवेशोत्सवाला केंद्रप्रमुख राजेंद्रप्रसाद गाड आणि उपसरपंच संतोष मिराशी यांनी उपस्थिती लावली.

इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने मुख्य प्रवेशद्वारावर ढोल पथकाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्याचे शैक्षणिक जीवनातील पहिल्या पाऊलाची कायमस्वरूपी आठवण राहावी यासाठी प्रवेशकर्त्या विद्यार्थ्यांचे दोन्ही पायाचे ठसे कोऱ्या कागदावर घेऊन पालकांना प्रशालेकडून सुखद भेट देण्यात आली.

विद्यार्थ्यांची ओळख प्रक्रिया झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तक आणि गणवेश वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रांचलन खंडगावकर तर आभार हळवे यांनी मानले. जिल्हा परिषद सदस्य वर्षा सांबारी यांचे प्रशाला आणि शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला.

फोटो : आचरा केंद्रशाळा येथे पहिलीमध्ये प्रवेशकर्त्या विद्यार्थ्यांच्या पाऊलखुणा पालकांना भेट देण्यात आल्या.

error: Content is protected !!