बांदा पोलिसांची खाकी की ‘भाईगिरी’?कास सरपंच प्रवीण पंडीत यांच्या समोरच दादागिरी करणाऱ्यांची वकिली कोणासाठी?

देव आणि देश या दोन्ही संकल्पना आपल्याकडे सर्वोच्च आदराच्या स्थानी आहेत. देवाच्या दारात प्रत्येकाला न्याय आणि शांतता मिळेल अशी श्रद्धा असते, तर देशाच्या कायद्याचे रक्षण करणारे पोलीस स्टेशन हे सामान्यांचे हक्काचे आधारपीठ मानले जाते. परंतु, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘कास’ गावातील देवस्थानात जो निंदनीय प्रकार घडला आणि त्यानंतर बांदा पोलीस स्टेशनच्या संबंधित निरीक्षकाने जी मुक्ताफळे उधळली, ती महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला आणि कायद्याच्या राज्याला काळीमा फासणारी आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे अध्यक्ष प्रवीण पंडित यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षाच्या काही विघ्नसंतोषी लोकांनी जो नंगानाच घातला, तो निव्वळ संतापजनक आहे. जाहीर कार्यक्रमात घुसून टेबल उडवून लावणे, देवस्थान कमिटीचा बोर्ड फाडणे ही कोणती संस्कृती? बरं, हे राडेबाज कोण? तर त्यातला एक चक्क शेजारच्या गोव्यात कायद्याचा रक्षक असलेला ‘हवालदार’ आहे आणि दुसरा दारूच्या व्यवसायात मग्न असलेला गुंडप्रवृत्तीचा इसम! ज्याच्या खांद्यावर कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, तोच जर देवस्थानात येऊन लोकप्रतिनिधीच्या हाताचा चावा घेऊन बोट फोडत असेल, तर यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते?
खाकी वर्दीची लायकी 'मर्डर'च्या सल्ल्यापुरतीच?
या संपूर्ण प्रकरणात गोव्याच्या त्या हवालदारापेक्षाही जास्त संतापजनक आणि आक्षेपार्ह भूमिका राहिली आहे ती बांदा पोलीस स्टेशनच्या 'शिवराज' नामक पोलीस निरीक्षकांची! जखमी अवस्थेत, अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी जेव्हा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आणि गावचे सरपंच पोलीस ठाण्याची पायरी चढतात, तेव्हा त्यांना न्याय देण्याऐवजी हा अधिकारी अत्यंत उद्दामपणे सांगतो, "तुम्ही मर्डर करून या, मग बघतो काय करायचं ते!" आमचा थेट सवाल आहे की बांदा पोलीस ठाण्याचे हे महाशय नक्की कायद्याचे रक्षक आहेत की गुन्हेगारांचे पोशिंदे? कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारने तुमच्या हातात लाठी आणि कंबरेला पिस्तूल दिले आहे की गुन्हेगारीला चिथावणी देण्यासाठी? एका जबाबदार लोकप्रतिनिधीला आणि सरपंचांना "मर्डर करून या" असा सल्ला देणाऱ्या या निरीक्षकाची मानसिक अवस्था तपासण्याची वेळ आली आहे.
बांदा पोलिसांची अरेरावी; सरपंचांवर समोरच दादागिरी!
अंगावर खाकी वर्दी चढवली म्हणजे कायद्यापेक्षा स्वतःला मोठे समजण्याची ही विकृत मानसिकता आता मोडून काढण्याची वेळ आली आहे. गुन्हेगारांवर जरब बसवण्याऐवजी, तक्रारदारालाच धमकावण्याचे धाडस या पोलिसांमध्ये येते कुठून? अशा बेजबाबदार आणि अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळेच आज खाकी वर्दीची नाचक्की होत आहे. गावात शांतता राखण्याची जबाबदारी असलेल्या सरपंचांसमोर जर पोलीसच अशी दादागिरीची भाषा करणार असतील, तर सामान्य जनतेने सुरक्षेसाठी जायचे कुठे?
एका व्हिडिओच्या रूपाने या संपूर्ण घटनेचा आणि बांदा पोलिसांच्या नाकर्तेपणाचा पुरावा आता जनतेसमोर आला आहे. पुरावे स्पष्ट असतानाही जर पोलीस प्रशासन अशा उर्मट अधिकाऱ्यावर आणि देवस्थानात धुडगूस घालणाऱ्यांवर कारवाई करणार नसेल, तर जनतेचा कायद्यावरील विश्वास उडेल.
आता गृहखाते जागे होणार का?
हा केवळ एका गावातील वादाचा प्रश्न राहिलेला नाही, तर तो खाकी वर्दीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न बनला आहे.सरपंचांवर आणि देवस्थानच्या अध्यक्षांवर झालेल्या या अन्यायाविरोधात आता जनतेचा आक्रोश तीव्र होत आहे.
देवस्थानाची तोडफोड करणाऱ्या आणि लोकप्रतिनिधींवर हल्ला करणाऱ्या त्या तथाकथित गोव्यातील हवालदारासह सर्व गुंडांवर तात्काळ कठोर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.तर तक्रारदाराला “मर्डर” करण्याचा सल्ला देणाऱ्या बांदा पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करून त्याची खात्यांतर्गत चौकशी झाली पाहिजे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा शांत आणि सुसंस्कृत जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला बांदा पोलिसांच्या अरेरावीचे ग्रहण लागू दिले जाऊ शकत नाही. गृहखात्याने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन बांदा पोलिसांची ही ‘भाईगिरी’ तात्काळ ठेचून काढावी, अन्यथा जनतेच्या असंतोषाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही!





