कणकवलीत महास्वच्छता अभियान व संडे ऑन सायकलचे आयोजन

तालुक्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे गटविकास अधिकारी यांचे आवाहन
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कणकवली यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ग्रामीण भागातील स्वच्छतेचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि स्वच्छतेची लोकचळवळ उभारण्यासाठी दिनांक 0४ जुन २०२६ रोजी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोहिमेच्या सर्वानी सहभाग घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी कणकवली श्री.अरूण चव्हाण यांनी केले.
ही मोहीम सर्व ग्राम पंचायतींमध्ये ४ जुन रोजी सकाळी ७.०० ते ९.०० वेळेत होणार असून या मोहिमेत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शाळा, अंगणवाडी, सर्व शासकीय कार्यालये, मंदिरे, बाजारपेठा, सार्वजनिक रस्ते व कचरा असणारी इतर ठिकाणे येथे अभियान राबवण्यात येणार आहे .
तसेच फिट इंडिया मिशन अंतर्गत ७ जून २०२६ रोजी “संडे ऑन सायकल” या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार असून अधिक तंदुरुस्त, निरोगी व सक्रिय भारत घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती गटविकास अधिकारी कणकवली अरुण चव्हाण यांनी दिली.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित करण्यात येणाऱ्या या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग नोंदविणे हा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सायकल वापराचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण, आरोग्य संवर्धन तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतादूत, बचत गट सदस्य, विद्यार्थी तसेच नागरिकांनी या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावर “संडे ऑन सायकल” उपक्रमाचे नियोजन करण्यात येणार असून सायकल रॅली, जनजागृती फेरी, स्वच्छता संदेश प्रसार आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सदर मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्यांनी फिट इंडिया मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.





