चिंदर गावातील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण…..!

श्री सतिश सावंत यांचे सलग चौथ्या वर्षी दातृत्व; अरविंद बुवा पाताडे यांचा पुढाकार
दानशूर व्यक्तीमत्व सतिश रघुनाथ सावंत यांच्या दातृत्वातून व अरविंद बुवा पाताडे यांच्या पुढाकारातून चिंदर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, खोड रबर, ड्रॉइंग बुक, फुटपट्टी आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण सेवानिवृत्त शिक्षक रावजी तावडे व पत्रकार विवेक परब यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यावेळी बोलताना सेवा निवृत्त शिक्षक रावजी तावडे म्हणाले की, सतिश रघुनाथ सावंत हे गेली चार वर्षे चिंदर गावातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत असतात. अगदी डहाणू पालघर पासून आपल्या सिंधुदुर्गातील अनेक विद्यार्थ्यांना सावंत शैक्षणिक साहित्याचे दरवर्षी वितरण करत आहेत. ते करत असलेले दातृत्व हे निस्वार्थी आणि निरपेक्ष असते. शाळा सुरू व्हायच्या आधी पासून स्वतःहून विद्यार्थी संख्या घेऊन सत्तरीच्या व्यक्तीने स्वतः खरेदी करून शैक्षणिक साहित्य पाठवणे हि सोपी गोष्ट नव्हे. शाळांना अनेक दानशूर व्यक्ती दातृत्व करत असतात या दातृत्वाचे चिज करा. स्पर्धा परीक्षा मध्ये सहभागी व्हा. अभ्यास करा आणि शाळेचे, आई वडिलांचे, आपले नाव उज्वल करा असे आवाहन हि तावडे यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती संख्या पाहता पुढचा काळ जिल्हा परिषद शाळेनंसाठी कसोटीचा असेल. अशी खंत तावडे यांनी व्यक्त केली.
यावेळी राजेंद्र प्रसाद गाड, नंदकुमार जुंधळे, स्मिता जोशी, वैशाली चव्हाण, संतोष राठोड, अरूण आडे, निशिगंधा वझे, मैना कारंडे, गायकवाड, सचिन तवटे, योजना माळगांवकर, अशोक घोलप, सुरेश माडये आदी शिक्षकांचे सहकार्य लाभले.






