राजकोट येथे साउंड-लेझर शोचा प्रस्ताव; शिवइतिहास आधुनिक पद्धतीने सादर होणार?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर साकारणार प्रकाश-ध्वनी शो; पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा
राजकोट पर्यटनाला नवे आकर्षण; साउंड आणि लेझर शोबाबत सकारात्मक हालचाली
मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमाखदार पुतळा सध्या हजारो पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत असून या पर्यटनातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. सिंधुदुर्ग किल्ला, राजकोट, पद्मगड आणि सर्जेकोट या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने मालवणमध्ये दाखल होत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभवशाली इतिहास आणि या ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व अधिक प्रभावी आणि आधुनिक पद्धतीने पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राजकोट येथील महाराजांच्या पुतळ्यावर कोइंबतूर येथील आदियोगी शिवा संकल्पनेच्या धर्तीवर साउंड आणि लेझर शो सुरू करण्याबाबत भाजपचे विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.
या संकल्पनेबाबत आमदार प्रमोद जठार यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले असून इतिहास अभ्यासिका डॉ. ज्योती पुरस्कार यांना या विषयासंदर्भातील स्क्रिप्ट तयार करण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
देशातील विविध पर्यटनस्थळांवर अशा प्रकारचे साउंड आणि लेझर शो पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. राजकोट येथेही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असा उपक्रम राबविल्यास पर्यटकांना इतिहास अनुभवण्याचा वेगळा अनुभव मिळेल, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले, त्यांचा पराक्रम आणि ऐतिहासिक वारसा अधिक प्रभावीपणे शिवप्रेमी आणि पर्यटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
गड-किल्ले संवर्धनाच्या विषयात आमदार प्रमोद जठार सातत्याने सकारात्मक भूमिका घेत असून त्यांच्या माध्यमातून विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्यांवर विविध उपक्रम राबविण्यात आल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. ही माहिती भाजप नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी दिली.





