‘आय लव्ह देवगड’ सेल्फी पॉईंट पुन्हा उजळला; विशाल मांजरेकर यांचा पुढाकार

स्वखर्चातून विद्युत दुरुस्ती; देवगडमधील सेल्फी पॉईंट झाला प्रकाशमय

नगरपंचायतीच्या दुर्लक्षानंतर नगरसेवकांचा पुढाकार; पर्यटकांत समाधान

देवगड एसटी स्टँड समोरील बालोद्यानाजवळ उभारण्यात आलेल्या ‘आय लव्ह देवगड’ सेल्फी पॉईंटवरील बंद पडलेली विद्युत व्यवस्था अखेर सुरळीत करण्यात आली आहे. ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक विशाल मांजरेकर यांनी स्वतः पुढाकार घेत स्वखर्चातून येथील विद्युत दुरुस्तीचे काम पूर्ण केल्याने संपूर्ण परिसर पुन्हा एकदा प्रकाशमय झाला आहे. या उपक्रमाबद्दल देवगडवासीयांसह पर्यटकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या मे महिन्याच्या सुट्टीनिमित्त देवगड शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असून विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्या जात आहेत. देवगड एसटी स्टँड समोरील ‘आय लव्ह देवगड’ हा सेल्फी पॉईंट पर्यटकांचे आकर्षण ठरत असून येथे अनेक जण सेल्फी काढून देवगडप्रती असलेले प्रेम छायाचित्रांमधून व्यक्त करत असतात.
मात्र, येथील विद्युत व्यवस्थेत बिघाड झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून हा परिसर अंधारात होता. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथे येणाऱ्या पर्यटकांना मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात छायाचित्रे काढावी लागत होती. या ठिकाणाची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी नगरपंचायतीकडे असतानाही याकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा होती.
अखेर नगरसेवक विशाल मांजरेकर यांनी स्वतः पुढाकार घेत आवश्यक दुरुस्ती करून सेल्फी पॉईंटची विद्युत व्यवस्था पूर्ववत केली. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना पुन्हा एकदा उजेडात या ठिकाणाचा आनंद घेता येणार आहे.
याबाबत बोलताना विशाल मांजरेकर यांनी पर्यटनवाढीच्या घोषणा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर टीका करत पर्यटनस्थळांवरील मूलभूत सुविधा, स्वच्छता आणि प्रकाशव्यवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.

error: Content is protected !!