१५ मे रोजी ‘वर्षा’वर आंबा बागायतदारांचा मोर्चा

आंबा बागायतदारांच्या लढ्याला शरद पवारांचा पाठिंबा
कोकणातील आंबा बागायतदारांवर आलेले संकट आणि राज्य सरकारकडून होत असलेले दुर्लक्ष पाहता, भविष्यात कोकणातील फळबाग शेती धोक्यात येण्याची भीती असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. १५ मे रोजी मुंबईत होणाऱ्या आंबा बागायतदारांच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पूर्ण पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंबा बागायतदारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सकाळी सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी आंबा, काजू आणि नारळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्याध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा अधिक प्रभावी आणि यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.
फळबाग लागवड योजना, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, उत्पादन खर्च, आंबा-काजू संशोधन केंद्राचे कार्य तसेच आयात-निर्यात धोरण या विषयांवरही यावेळी सखोल चर्चा झाली. राज्य सरकारने जाहीर केलेली प्रति हेक्टर २२ हजार रुपयांची मदत अत्यंत अपुरी असून, ती बागायतदारांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याची तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना ५ लाख आणि ३ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ असा भव्य मोर्चा काढणार आहेत.
या आंदोलनात काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, धर्मराज्य पक्ष आणि कुणबी सेना सहभागी होणार आहेत.
दुपारी ३ वाजता गिरगाव चौपाटी येथील टिळक पार्क येथून मोर्चाला सुरुवात होणार असून मोठ्या संख्येने आंबा बागायतदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी मराठी भाषा केंद्राचे प्रमुख दीपक पवार, गणेश गावकर तसेच विविध शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.





