भारताचा आयात मुक्त संकल्प – निकृष्ट परकीय वस्तूंना भारतीय कौशल्याचे उत्तर!

स्वदेशी स्वावलंबनासाठी नव्या क्रांतीचे आवाहन
स्वावलंबी भारत अभियान कोकण प्रांत समन्वयक, स्वदेशी जागरण मंच कोकण प्रांत प्रचार प्रमुख अनिकेत वालावलकर यांची माहिती
कालच आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात स्वदेशी वस्तूंच्या वापराचा पुनरुच्चार करत एक प्रभावी आवाहन दिले आहे. स्वदेशीचा हा विचार केवळ आजचा नसून, स्वदेशी जागरण मंच देखील गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत निष्ठेने आणि व्यापक स्तरावर स्वदेशीचा प्रचार व प्रसार करत आहे. या पार्श्वभूमीवर, आता देशातील व्यापारी आणि उत्पादकांनी एकत्र येऊन भारताला खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवण्याचे पाऊल उचलणे अनिवार्य झाले आहे.
निकृष्ट आयातीला मेक इन इंडियाचा चाप बसवावा
दैनंदिन वापरातील खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स, सजावटीच्या वस्तू आणि घरगुती उपकरणांसाठी आपण इतर देशांतून येणाऱ्या, विशेषतः निकृष्ट दर्जाच्या मालावर अवलंबून राहणे आता पूर्णपणे थांबवावे. या आयात वस्तू स्वस्त असल्या तरी त्या शाश्वत नसतात. ही स्थिती बदलण्यासाठी आपल्या देशातील तरुण उद्योजकांनी अशा वस्तूंचे स्थानिक स्तरावर प्रचंड प्रमाणात उत्पादन सुरू करावे. जे आपण आयात करतो, ते आपण इथेच अधिक सरस बनवू शकतो, ही जिद्द बाळगून घराघरात स्वयंरोजगाराची केंद्रे उभी राहावीत, ही काळाची गरज आहे.
व्यापारी साखळीचा स्वदेशी निर्धार असावा
परकीय कंपन्यांच्या मक्तेदारीला सुरुंग लावण्यासाठी व्यापारी संघटना आणि उत्पादकांनी समन्वयाने कार्य करावे
नफ्यासोबत किंव्हा नफयापेक्षा राष्ट्रहित महत्वाचे, भारतीय उत्पादन युनिट्सनी दुकानदार आणि घाऊक विक्रेत्यांना परकीय कंपन्यांच्या तुलनेत अधिक मार्जिन उपलब्ध करून द्यावे.
विदेशी वस्तूंना शक्य तेवढे स्वतःहून नकार द्यावा, दुकानदारांनी विदेशी वस्तूंची ऑर्डर किमान स्तरावर आणावी किंवा शक्य असल्यास पूर्णपणे बंद करावी. आपल्या दुकानात केवळ भारतीय बनावटीच्या वस्तूंनाच अग्रक्रम आणि दर्शनी जागा मिळावी.
स्वदेशी स्वावलंबन आणि स्वयंरोजगाराचा जागर
जेव्हा आपण स्थानिक उत्पादन सुरू करतो, तेव्हा केवळ वस्तू तयार होत नाही, तर त्यातून स्वयंरोजगाराचा महाविस्फोट होतो. ग्रामीण आणि निमशहरी भागांत लघुउद्योगांचे जाळे विणले जावे, जेणेकरून तिथल्या हातांना तिथेच काम मिळेल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि देशाचा पैसा देशातच खेळता राहील. हे स्वयंपूर्ण गाव, स्वयंपूर्ण देश या स्वप्नाकडे पडलेले सर्वात मोठे पाऊल ठरावे.
आयात नव्हे, आता निर्यात हेच लक्ष्य ठेवावे
भारताची ही नवी व्यापारी रणनीती केवळ स्वतःपुरती मर्यादित नसावी. जागतिक दर्जाच्या वस्तू तयार करून आपण आयातीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवावे आणि निर्यातीवर सर्वाधिक भर द्यावा. भारताने बनवलेली वस्तू जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी, हे ध्येय प्रत्येक भारतीय उद्योजकाने आणि व्यापाऱ्याने समोर ठेवावे.
नागरिकांचे कर्तव्य व्होकल फॉर लोकलचे अनुष्ठान
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे आवाहन आणि स्वदेशी जागरण मंचाची अनेक वर्षांची तपश्चर्या तेव्हाच फळाला येईल, जेव्हा प्रत्येक नागरिक सजग होईल.
विदेशी वस्तूंचा मोह म्हणजे आर्थिक पारतंत्र्याचे आमंत्रण आहे. आपण जेव्हा स्वदेशीचा स्वीकार करतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने देशाच्या आर्थिक स्वातंत्र्याचे रक्षक बनतो
आज प्रत्येक क्षेत्रात भारतीय बनावटीच्या उत्पादनांचा दबदबा निर्माण व्हावा आणि आपण देशाला एक अभेद्य आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने प्रस्थान करावे,
स्वदेशीचा नारा, हाच भारताचा खरा प्रगत चेहरा
स्वदेशी जागरण मंच कोकण प्रांत तर्फे आवाहन करण्यात येते की, प्रांतातील सर्व व्यापारी संघटना, छोटे मोठे कारखानदार आणि उद्योजकांनी स्वतःला या मंचाशी जोडून घ्यावे. वैयक्तिक नफ्यापलीकडे जाऊन राष्ट्रहित जोपासण्याची हीच ती योग्य वेळ आहे.. या सामील व्हा.





