निसर्गरम्य आंबोलीत २ ऑगस्टला ‘मान्सून मॅरेथॉन’चा थरार

सह्याद्री ऍडव्हेंचर आणि सायकलिस्ट असोसिएशनचा पुढाकार
२१, १० आणि ५ किमी गटात होणार स्पर्धा
सिंधुदुर्गचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणाची सर्वानाच भुरळ पडते. पण काहीवेळा पर्यटनाचा अतिउत्साह जीवावर बेततो. दऱ्याखोऱ्यात, अपघातात माणसे जीव गमावून बसतात. मग त्यांच्यासाठी निरपेक्ष वृत्तीने धावून जातात ते बाबल आल्मेडा त्यांच्या सह्याद्री ऍडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुपचे धाडसी शिलेदार. आंबोली सारख्या निसर्गात आल्यावर जो काही उत्साह असतो त्याच उत्साहाला, त्याच उर्जेला योग्य मार्ग देण्याचे काम गेली ३ वर्ष सह्याद्री ऍडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आयोजित आंबोली मॅरेथॉनच्या माध्यमातून होत आहे. यावर्षी देखील सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग या संस्थेच्या सहकार्याने रविवार दिनांक २ ऑगस्टला या आंबोली मॅरेथॉनच आयोजन करण्यात आले आहे. याबद्दल आज कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या दोन्ही संस्थांकडून माहिती देण्यात आली.
आंबोलीच्या निसर्गरम्य आणि धुक्याच्या दरीत धावण्याची सुवर्णसंधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. ‘सह्याद्री ऍडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली-सांगेली’ आणि ‘सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग’ यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या भव्य “आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६” विषयी आज हॉटेल स्पाईस कोकण येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला सह्याद्रि ऍडव्हेंचर रेस्क्यू ग्रुप आंबोलीचे मायकेल डीसूझा, संदेश गोसावी, संतोष पालेकर, नारायण चव्हाण, राजू राऊळ, विशाल बांदेकर, सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर, रुपेश तेली, शिवप्रसाद राणे, डॉ. बापू परब, बाबा पोरे, सचिन मदने आदी उपस्थित होते.
मायकल डिसुझा यांनी सांगितले कि, सह्याद्री ऍडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली- सांगेली या संस्थेमार्फत अध्यक्ष बाबल आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेली ३० ते ३५ वर्षे आंबोली घाट परिसर, जिल्ह्यातील सर्वत्र डोंगराळ भाग तसेच पाण्यातील आपत्कालीन बचाव (रेस्क्यू) चे कार्य विनामोबदला करत आहोत. तसेच इतर विविध सामाजिक कार्यामध्येही आमच्या संस्थेचा सहभाग असतो. या स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष असून, फिटनेस, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटन वृद्धीसाठी ही स्पर्धा घेतली जात आहे.
सायकलिस्ट असोसिएशनचे गजानन कांदळगावकर यांनी स्पर्धंविषयी माहिती देताना सांगितले कि, ५, १० आणि २१ किलोमीटर मध्ये हि स्पर्धा होणार आहे. ५ किमी साठी आंबोली चेकपोस्ट ते शिरगावकर सनसेट पाईंट, १० किमी साठी आंबोली चेकपोस्ट ते नेणेवाडी आणि २१ किमी आंबोली चेकपोस्ट ते चौकुळ तोरपवाडी असा मार्ग असणार आहे. स्पर्धेसाठी पुरुष व महिलांसाठी ३५ ते ४५ वर्षे, ४५ ते ६० वर्षे आणि ६० वर्षांवरील असे वयोगट निश्चित करण्यात आले आहेत.
रुपेश तेली यांनी बक्षीस रकमांविषयी माहिती दिली. या स्पर्धेच्या विजेत्याना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. २१ किमी साष्टी – प्रथम रोख २० हजार व चषक, द्वितीय रोख १५ हजार व चषक. १० किमी – प्रथम – १० हजार व चषक, द्वितीय ७ हजार व चषक, ५ किमी मध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना मेडल व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धावपटूंसाठी विशेष तिने बक्षिसे सगळ्या गटासाठी असणार आहेत, असेही रुपेश तेली यांनी सांगितले.
यावेळी शिवप्रसाद राणे म्हणाले, या स्पर्धेत सिंधुदुर्ग तथा संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक तथा इतरही राज्यांमधून धावपटू सहभागी होणार आहेत. सहभागी धावपटूंना टी-शर्ट, आकर्षक मेडल व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांचे सहकार्य लाभणार आहे.
स्पर्धेच्या दिवशी सकाळी ठीक ०७.०० वाजता उद्घाटन व फ्लॅग ऑफ होऊन स्पर्धेला सुरुवात होईल. सकाळी ठीक ०९.०० वाजता धावपटूंना मेडल व प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल.
यावेळी डॉ. बापू परब म्हणाले, स्पर्धेसाठी सर्व धावपटूंनी आपला सहभाग नोंदवावा आणि आंबोलीच्या गार हवेत, रिमझिम पावसात, शुभ धुक्याच्या चादरीत, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगातून धावण्याचा मनमुराद आनंद लुटावा. निसर्गप्रेमी, पर्यटक, व नागरिकांनीही या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा.
सिंधुदुर्ग जिल्हयातील जास्तीत जास्त धावपटूंनी या आंबोली मान्सून मॅराथान मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सह्याद्री ऍडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली-सांगेली आणि ‘सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे. नावनोंदणी साठी उत्तम नार्वेकर (9421014647), शिवप्रसाद राणे (9921959989) किंवा रुपेश तेली (9421261212) यांच्या संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.






