अंत्योदय लाभार्थ्यांसाठी रॉकेल वितरण ठरतेय जिकिरीचे

लाभार्थी एका गावात तर रॉकेल पुरवठा केंद्र ३० किलोमीटर वर
त्या त्या गावात रॉकेल वितरण केंद्राची मागणी
कुडाळ तालुक्यातील अंत्योदय लाभार्थ्यांसाठी रॉकेल मिळविणे म्हणजे ‘कोंबडी चार आण्याची आणि मसाला बारा आण्याचा’ अशी परिस्थिती झाली आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणारे रॉकेल त्यांच्या गावात वितरित न करता पंचक्रोशीतील एका दुकानावर वितरण व्यवस्था केल्याने दूरवरून केवळ तीन लिटर रॉकेल साठी येणाऱ्या अंत्योदयच्या लाभार्थ्यांना ते मोठे गैरसोयीचे, जिकिरीचे आणि आर्थिक भुर्दंड पडणारे ठरणार आहे. त्यामुळे हे रॉकेल त्या-त्या गावच्या ठिकाणी वितरित करण्यासाठी शासनाने परवाने द्यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या अंत्योदय अन्न योजने (AAY) अंतर्गत प्रामुख्याने समाजातील सर्वात गरीब आणि गरजू घटकांना शिधापत्रिकेद्वारे अन्नधान्य आणि रॉकेल (केरोसीन) सारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. अंत्योदय अन्न योजनेचा मुख्य उद्देश समाजातील “गरीबांमधील अतिगरीब” कुटुंबांना आधार देणे आहे. यात प्रामुख्याने भूमीहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी आणि ग्रामीण कारागीर, शहरी भागातील रोजंदारीवर काम करणारे मजूर,
विधवा, अनाथ, दिव्यांग व्यक्ती किंवा ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती जे कुटुंबाचे प्रमुख आहेत आणि ज्यांना उत्पन्नाचे कोणतेही निश्चित साधन नाही किंवा सामाजिक आधार नाही. सर्व आदिम जमाती कुटुंबांना या योजनेसाठी पात्र मानले जाते. तसेच वार्षिक उत्पन्न १५ हजार पेक्षा कमी असलेल्याना याचा लाभ मिळतो.
अंत्योदय योजनेतील जो रॉकेलचा पुरवठा आहे तो त्या त्या गावात होणे अपेक्षित आहे. पण भडगावसह कडावल, निरूखे, पांग्रड, सोनवडे त. कळसुली, कुपवडे, घोडगे, जांभवडे, भूतवड, नेरूर क. नारूर, कारीवणे, नारूर क. नारूर, डिगस, टेबगांव, वर्दे, हुमरमळा अणाव, आवळेगाव या गावातील अंत्योदय लाभार्थ्यांना रॉकेल नेण्यासाठी भडगाव-वाणी स्टॉप येथील विक्रेत्याकडे येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर कुंदे, पोखरण, कुसबे, आंब्रड, वेताळबांबडे, मुळदे, तुळसुली तर्फ माणगांव, बांव, सोनवडे तर्फ हवेली, सरंबळ, कसाल, पडवे, गावराई, ओरोस, अणाव, पणदूर, केरवडे कर्याद नारूर, कुसगांव, गिरगांव, हिलॉक, तुळसुली क. नारूर, खुटवळवाडी, निवजे या गावातील लोकांना कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाअंतर्गत पावशी येथील धान्य दुकानात रॉकेलसाठी यावे लागणार आहे.
अंत्योदय योजेतील लाभार्थ्यांना प्रति कार्ड ३ लीटर रॉकेल मिळणार असून रॉकेल दर ६३.९० रु. आहे. मुळात अंत्योदय योजनेचे लाभार्थी हे अतिशय कमी उत्पन्न गटातील असतात. एसटी बस मधून रॉकेल वाहतूक करता येत नाहीत. मग या लाभार्थ्यांनी रॉकेल वाहतूक करून कसे न्यायाचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यातील बहुतेक गावे हि सह्याद्रीच्या कुशीत आहेत. त्यांचे भडगाव आणि पावशी पासूनचे अंतर खूप आहे. रिक्षाकरून यायचे झाले तरी वार्षिक १५ हजार रुपयेपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या या लाभार्थ्यांना ७००-८०० रुपये रिक्षा भाडे परवडणार आहे का ? असा सवाल आंब्रडचे माजी जिल्हा परिषद सदस्य आबा मुंज यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि कुडाळ तहसीलदार यांचे सुद्धा लक्ष वेधून यावर तोडगा काढण्याची मागणी केली.
तसेच माजी जि प सदस्य लॉरेन्स मान्यकर यांनी सुद्धा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन अति दुर्गम अशा ४०/४२ किलोमीटर अंतरावरील लोकांना हे रॉकेल परवडणारे नसल्याकडे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे त्या त्या भागात रॉकेल परवाना विक्रीसाठी त्यांना देण्यात यावे. तरच त्यांना सोईचे ठरेल अशी मागणी केली आहे. ज्यांच्यासाठी भडगाव हे वितरण केंद्र आहे, अशा परिसरातील अंत्योदय लाभार्थ्यांना १२ जुलै पर्यंतच साठा असल्याने त्वरित रॉकेल घेऊन जावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
लोकांची सोय व्हावी, समाजातील शेवटच्या घटकाला चांगले जीवन जगता यावे, यासाठी शासन विविध योजना राबविते. अंत्योदय योजनेअंतर्गत सुद्धा समाजातील शेवटच्या घटकासाठी रॉकेल पुरवठा योजना आहे. पण हे रॉकेल जर त्या लाभार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या गावात उपलब्ध न होता त्यासाठी दुसऱ्या गावात जाऊन अधिकचे पैसे आणि वेळ फुकट घालवावा लागत असेल तर मग अशा योजनांचा फायदा काय ? असा सवाल लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित करत आहेत.






