आठवडा बाजारा दिवशी शहरातील इतर रस्त्यांवरील ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा पुढाकार

आठवडा बाजारा दिवशी शहरात रस्त्यांवर लावलेल्या दुकानांचा घेतला आढावा
कणकवली शहरात मंगळवारी आठवडा बाजारा दिवशी विक्रेत्यांनी दुकाने रस्त्यावर लावून वाहतुकीस अडथळा करू नये. बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना विनाअडथळा फिरता यावे या अनुषंगाने दुकाने लावा. अन्यथा पूर्व सूचना दिल्याशिवाय कारवाई केली जाईल असा इशारा कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी काल दिला. काल मंगळवारी दुपारी श्री पारकर यांनी बाजारपेठ ढालकाठी भागातील कंजूमर सोसायटी जवळ येणाऱ्या रस्त्यावर दुकाने लावलेल्या विक्रेत्यांना सूचना दिल्या. आठवडा बाजारा दिवशी बाजारपेठेत दुकाने लावणे योग्य असले तरी बाजारपेठेतून बाहेर जाणारे रस्ते हे विक्रेत्यांनी अडवले गेल्यास सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांना होते. याबाबतच्या जनतेच्या सातत्याने तक्रारी येत राहतात. त्यामुळे बाजारपेठे व्यतिरिक्त बाहेरील रस्त्यांवरील थाटलेली दुकाने ही गटाराच्या आत मध्येच असली पाहिजेत. याकरिता नगरपंचायत चे दोन कर्मचारी नियुक्त केले असून कर वसुली व या व्यवसायिकांना सूचना देण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले आहे. यावेळी उपस्थित असलेले कर्मचारी रवींद्र महाडेश्वर यांना देखील पारकर यांनी सूचना देत डीपी रोड पासून बाजारपेठेला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर लावण्यात आलेले दुकाने ही गटाराच्या मागे बसवली पाहिजेत अन्यथा त्यांच्यावर एकदा सूचना द्या वं नंतर कारवाई करा अशी देखील श्री पारकर यांनी सांगितले. आठवडा बाजारा दिवशी शहरातील जनतेला व ग्राहकांना होणाऱ्या समस्या श्री पारकर यांनी जाणून घेतल्या.





