कुडाळ तहसील पथकाची बेकायदेशीर वाळू उपशावर धडक कारवाई

वाळूचे अनधिकृत रॅम्प केले उध्वस्त

कुडाळ तालुक्यातील कर्ली नदीकाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर काल जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांच्या निर्देशानुसार व उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कुडाळच्या पथकाने मोठी कारवाई केली. यामुळे बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
काल दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी उशिरा तहसीलदार सचिन पाटील, निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, मंडळ अधिकारी रविकांत तारी, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती मयेकर, नेरकर, सागरे, इंदप, कनवडे, पोलिस पाटील यांच्या पथकाने कर्ली नदी किनाऱ्यावरील अनधिकृत वाळूचे रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केले.
सध्या कर्ली नदीमधील वाळू गटांचे लिलाव प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने, वाळू उपशाला बंदी असूनही कर्ली नदीमध्ये बोटींद्वारे वाळू काढली जात होती. याच अवैध वाळू वाहतुकीसाठी रॅम्प मालकांनी नदीकिनारी विविध ठिकाणी अनधिकृत रॅम्प तयार केले होते.

error: Content is protected !!