लवकरच लहान मुलांसाठी घरपोच ऑनलाईन आधारकार्ड मिळणार

मंत्री आशिष शेलार यांची माहिती
कुडाळमध्ये आधार किटचे वाटप
राज्यातील शून्य ते सात वर्षे वयोगटातील १२ ते १४ टक्के बालकाना अजून आधारकार्ड मिळालेले नाही. त्यासाठी आधार केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन घरपोच आधारकार्ड देण्याची सुविधा लवकरच कार्यान्वित होईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार यांनी दिली. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड बनविण्याचा धोका आधार केंद्र चालकांनी लक्षात घेऊन सजग राहून काम करावे असते आवाहन देखील मंत्री आशिष शेलार यांनी केले. येथील श्री महालक्ष्मी हॉल येथे आज सकाळी आधार किट वाटप आणि आपले सरकार सेवा केंद्र चालक याच्याशी संवाद कार्यक्रमात मंत्री श्री. शेलार बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील सहा आधार केंद्रांना किटचे वाटप करण्यात आले.
आधार किट वाटप आणि आपले सरकार सेवा केंद्र चालक याच्याशी संवाद कार्यक्रमाचे आज सकाळी महालक्ष्मी हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सांस्कृतिक आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री ऍड. आशिष शेलार, आमदार निलेश राणे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, तहसीलदार सचिन पाटील, बिडीओ प्रफुल्ल वालावलकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्ह्यातील सहा आधार केंद्र चालकांना मान्यवरांच्या हस्ते आधार किट चे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री ऍड. आशिष शेलार म्हणाले, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये नगरी प्रशासनाच्या सर्व गोष्टी हळूहळू काटेकोर होऊ लागल्या आहेत. त्या गोष्टी पूर्ण केल्यातरच नागरिकांना त्यांच्या अधिकाराचा उपयोग करता येतो. त्या दृष्टीने आजचा हा आधार किट वाटपाचा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे. आधारकार्डचे महत्व आपल्या आयुष्यात खूप मोठे आहे. त्यामुळे आधार किटचा वापर महत्वाचा ठरतो. ते किट दिले गेले तर त्याचा वापर होईल आणि साहजिकच नागरिकांना त्याचा फायदा होईल. आधारकार्डवरच सगळ्या गोष्टी अवलंबून असल्याने संपूर्ण राज्यात शासनाच्या वतीने आधार किटचे वाटप केले जात आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी आधार किट जिल्हाधिकारी कार्यालयातच पडून आहेत असे लक्षात आले आहे. हि किट आधारकेंद्र चालविणाऱ्या बांधवांपर्यंत पोहोचलीच नाही तर नागरिकांना सुविधा मिळू शकत नाही. त्यामुळे कुठल्याही जिल्ह्यात दौऱ्यावर असताना मी आधार किट वाटप करतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३८ आधार किट दिले आहेत. त्यापैकी सहा जणांना आज किट वाटप होते आहे हि समाधानाची गोष्ट आहे, असे मंत्री श्री. शेलार यांनी सांगितले.
आपले सरकार केंद्राच्या वतीने नागरिकांना त्यांचा अधिकार मिळतो. अनेक दाखले, कागदपत्र मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधार केंद्र चांगली चालताहेत. पण सगळे दाखले नागरिकांना ऑनलाईन मिळावेत यासाठी शासनाने बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. त्यामध्ये मेटा कंपनीशी करार, शुल्क २० रुपयांवरून ५० रुपये करणे, लोकसंख्येवर आधारित आधार केंद्रांची संख्या निश्चित करणे अशा बाबींचा समावेश आहे. नागरिकांसाठी भविष्यात अजून चांगल्या सुविधा आणणार आहे. यामध्ये आधार केंद्राच्या माध्यमातून घरपोच ऑनलाईन दाखले देण्यात येणार आहेत. सर्व आधार केंद्र उत्कृष्ट काम करत आहेत पण ते अतिउत्कृष्ट झाले पाहिजे. काही अडचणी असतील तर शासन-प्रशासनाला सांगा असे आवाहन ऍड. आशिष शेलार यांनी केले. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सुशासन देणार असल्याचे आश्वासित केले आहे. त्यामुळे ते राबविण्याची जबाबदारी आपली असल्याची जाणीव मंत्री शेलार यांनी उपस्थित आधार आणि आपले सरकार केंद्र चालकांना करून दिली.
आमदार निलेश राणे यांनी देखील आधार केंद्र चालकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले. स्वागत तहसीलदार सचिन पाटील, नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी तर आभार प्रदर्शन बीडीओ प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हाभरातून आधार केंद्र आणि आपले सरकार केंद्र चालक, नागरिक, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






