प्रवीण काकडे यांना ‘महाराजा यशवंतराव होळकर राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल; चांदवड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार गौरव
समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे यांना यावर्षीचा मानाचा ‘महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. आदिवासी धनगर साहित्य संमेलन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा बहुमान प्रदान करण्यात येणार आहे.
प्रवीण काकडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुर्गम भागात शैक्षणिक कार्याचा डोंगर उभा केला आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हयातील अतिदुर्गम वाड्या-वस्त्यांवर जिथे पोहोचणे कठीण आहे, अशा ठिकाणी काकडे यांनी मदतीचा हात पोहोचवला आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटात जेव्हा ऑनलाईन शिक्षण ही चैन ठरत होती, तेव्हा काकडे यांनी प्रत्यक्ष जंगलात आणि दऱ्याखोऱ्यात जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. सिंधुदुर्गातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी राबविलेली मोहीम आजही तिथे कौतुकाचा विषय ठरत आहे.
येत्या ११ व १२ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील ऐतिहासिक अहिल्यादेवी होळकर वाड्यात हा पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माजी आमदार रामहरी रूपनवर, श्रीमंत अमरजीत राजे जहागीरदार (तळोदा संस्थान), खासदार रामराव वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, संमेलनाध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर, बाळासाहेब कर्णवर पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
त्यांनी नोकरी सांभाळून प्रत्येक सुट्टीच्या दिवशी ते दुर्गम भागात जाऊन ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत मदत केली आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त २०२५ मध्ये त्यांनी कराडमध्ये १४६, पुण्यात ९० आणि नवी मुंबईत १४१ महिलांचा गौरव केला. तसेच एकाच वेळी २४५ विद्यार्थ्यांना ‘शिक्षण रत्न’ पुरस्काराने सन्मानित केले. कराड येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे MPSC-UPSC सेंटर उभे करण्याचा त्यांचा मानस आहे.
यापूर्वी त्यांना भारत सरकारचा (ॲम्युनेशन फॅक्टरी) ‘समाजरत्न पुरस्कार’, ‘राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ (MIT पुणे) आणि ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आता जाहीर झालेल्या या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथील समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





