खारेपाटण महाविद्यालयात सदिच्छा समारंभ व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खारेपाटण येथे विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ व पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या प्राची इस्वलकर, तसेच पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विजय देसाई सर होते.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल त्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयातील आठवणी आणि अनुभव व्यक्त केले.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना भविष्यातील ध्येय ठरवून प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच प्रा तानाजी गोदडे ,प्रा वसीम सय्यद यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालाप्रति आपल्या आदरयुक्त भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रश्मी देसाई मॅडम यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख प्रा. वसीम सय्यद सर यांनी करून दिली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. माधवी पांचाळ मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम आनंदी आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.





