कृषी विभागाला उशिराने सुचलेले शहाणपण, अखेर महोत्सवाला उद्घाटक म्हणून पालकमंत्री नितेश राणेंना निमंत्रण!

जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांसहित सभापती उपसभापतींची नावे देखील आली पत्रिकेत

कृषी विभागाच्या “मॅनेज” कार्यपद्धतीबाबत कोकण नाऊ ने केले होते वृत्तप्रसारीत

कणकवली कृषी महोत्सव व शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमात कणकवलीतील सभापती, उपसभापती यांच्यासह लोकप्रतिनिधींचा विसर पडल्या बाबत कोकण नाऊ च्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध केल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या तालुका कृषी विभागाने या कार्यक्रम पत्रिकेमध्ये बदल केला आहे. तसेच कार्यक्रमामधील शेतकरी मेळावा ऐवजी आता नवीन कार्यक्रम पत्रिकेमध्ये खरेदीदार विक्रेता संमेलन समाविष्ट करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत उपाध्यक्ष दादा साईल व सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत घातली गेली आहेत. यामध्ये कणकवली कॉलेजच्या परिसरात 24 मार्च रोजी होत असलेल्या या कार्यक्रमादरम्यान सभापती उपसभापतींसह पंचायत समिती सदस्यांचा विसर कृषी विभागाला पडला होता. याबाबतची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर काही पंचायत समिती सदस्यांनी थेट कृषी अधिकाऱ्यांना फोन करून नाराजी व्यक्त केली होती. यानंतर खडबडून जाग्या झालेल्या कृषी विभागाच्या “मॅनेज सिस्टीम” मधील अधिकाऱ्यांनी नामानिराळे राहण्याची भूमिका घेतली. त्यानंतर कार्यक्रम पत्रिका बदलत कार्यक्रमाचे स्वरूप देखील बदलले आहे. नवीन जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार कृषी महोत्सव व खरेदीदार विक्रेता संमेलन 2026 या मथळ्याखाली हा कार्यक्रम होत असून 24 मार्च रोजी सकाळी 9 वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सहित जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सभापती हर्षदा वाळके उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची नावे निमंत्रण पत्रिकेत टाकली आहेत. त्यासोबत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी भाग्यश्री नाईकनवरे उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील तालुका कृषी अधिकारी प्रवीण ओहोळ यांनी या कार्यक्रमाला सर्वांना निमंत्रित केले आहे. या कार्यक्रमादरम्यान कृषी विषयक चर्चासत्र व परिसंवाद, नाविन्यपूर्ण व प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव कथन, कृषी पूरक व्यवसाय मार्गदर्शन, शासनाच्या विविध कृषी विषयक उपक्रमांची माहिती, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र, सुधारित व संकरित बियाणे सेंद्रिय व रासायनिक खते माहिती केंद्र, प्रक्रिया युक्त शेतमालाचे प्रदर्शन व विक्री, धान्य महोत्सव, प्रयोगशील महिला शेतकऱ्यांचा सन्मान, खरेदीदार व विक्रेते यांचे संमेलन असे उपक्रम या महोत्सवा दरम्यान राबविले जाणार आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा महोत्सव व खरेदीदार विक्रेता संमेलन असणार आहे.

error: Content is protected !!