खेत बचाव अभियानातून जनजागर

किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचा स्तुत्य उपक्रम
रासायनिक खते कीटकांचा वापर कमी करून सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढवा
शाश्वत उत्पन्नासाठी नैसर्गिक शेती पर्याय
किर्लोस कृषी विज्ञान केंद्राद्वारे कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जून ते 30 जून या कालावधीत खेत बचाव अभियान राबविण्यात आले. केंद्र सरकार द्वारे घोषित केलेल्या या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रासायनिक खते कीटकनाशकांचा वापर कमी करून सेंद्रिय व नैसर्गिक निविष्ठांचा वापर वाढवावा असा सल्ला गावा गावामध्ये शेतकऱ्यांना देण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास 50 गावांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. नैसर्गिक शेती, माती नमुना घेण्याची पद्धत, खतांचा संतुलित वापर, पर्यावरण बदल, बियाण्यांची उगवण क्षमता या विषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमा दरम्यान नैसर्गिक शेतीच्या उपयुक्त निविष्ठा उदा. जिवामृत, बिजामृत गोकृपा अमृत,घनजीवामृत, दशपर्णी अर्क इत्यादी प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून जवळपास 10000 लिटर गोकृपा अमृत बनवून त्यांचा पावसाळी हंगामात वापर करण्यात येत आहे. किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे, प्रकल्प संचालक आत्मा श्रीम. भाग्यश्री नाईकनवरे,उपप्रकल्प संचालक आत्मा श्रीम. प्रगती तावरे यांच्या समन्वयाने गावागावात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमेमध्ये कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा आणि कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जवळपास 5000 शेतकऱ्यांना या मोहिमे अंतर्गत माहिती देऊन प्रात्यक्षिके दाखविण्यात आली आहेत.






