ओरोस येथे एलसीबीची मोठी कारवाई

तब्बल ३० लाखांच्या मुद्देमालासह प्रतिबंधित गुटखा जप्त
तिघांवर गुन्हा दाखल!
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत बंदी घालण्यात आलेला गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईत २१ लाख ६३ हजार ४५० रूपये किंमतीच्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थासह टेम्पो मिळून एकूण ३० लाख १३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई 3 जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ओरोस येथील खर्येवाडी परिसरातील खालसा पंजाबी ढाब्यासमोर गोवा–मुंबई महामार्गावर करण्यात आली.
बांदा येथून रत्नागिरीच्या दिशेने सदर टेम्पोतून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत होती. ओरोस खर्येवाडी येथे एसलीबीच्या पथकाने वाहन तपासणी दरम्यान सदर टेम्पो थांबवून तपासणी केली असता, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी गोपाळ राजाराम गवस (३४, रा. दाणोली अन्नपूर्णावाडी, ता. सावंतवाडी), शिरीष सुभाष गवळी (३५, रा. माठेवाडा, सावंतवाडी) आणि सिद्धेश सुभाष केसरकर (३४, रा. आळेवाडी, बांदा, ता. सावंतवाडी) यांच्याविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा, 2006 तसेच भारतीय न्यायसंहिता, 2023 मधील विविध कलमान्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग कडून देण्यात आली.
या कारवाईदरम्यान 21 लाख 63 हजार 450 रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांचा साठा तसेच 8 लाख 50 हजार रुपयांचे अशोक लेलँड ‘बडा दोस्त’ वाहन (टेम्पो) असा एकूण 30 लाख 13 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल विल्सन डिसोझा, आशिष जामदार तसेच पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजीसकर आणि ऋषिकेश टोपले यांनी ही कारवाई केली.






