अंगणवाडी व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत मदत करणार!

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे प्रतिपादन
अंगणवाडी सेविका शहरातील लहान मुलांवर चांगले संस्कार घडवतात – उपनगराध्यक्ष सुशांत नाईक
अंगणवाडी व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायतीकडून लागेल ती मदत करण्यात येईल. तसेच भविष्यात शहरात आणखी अंगणवाड्या वाढवण्यासाठी मागणीनुसार नगरपंचायत योग्य ती मदत करेल, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बाल विकास विभाग तसेच अंगणवाडीच्या वतीने कणकवली येथे लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उद्घाटन नगराध्यक्ष संदेश पारकर उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या हस्ते झाले. प्रथमता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्ष संदेश पारकर उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
अंगणवाडी सेविका शहरातील लहान मुलांवर चांगले संस्कार घडवतात. शहरात फक्त सहा अंगणवाडीशाळा आहेत. यावेळी अजून अंगणवाडीशाळा वाढवण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला. अंगणवाडी सेविका या गरोदर महिलांचे संगोपन करण्यापासून ते लहान मुलांच्या वाढी पर्यंत या सेविका काम करतात. खरं म्हणजे या सेविका लहान मुलांच्या दुसऱ्या आई प्रमाणे त्यांचे पालन, पोषण व संगोपन करण्याचे काम करतात असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केले. संगोपनातून लहान मुलांवर संस्कार घडवण्याचे मोलाचे काम या अंगणवाडी सेविका करतात. यामुळे त्यांच्या मेहनतीच फळ त्यांना देण गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने त्यांचे वेतन वाढ करणे गरजेचे आहे अशी मागणी यावेळी करण्यात अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, नगरसेविका जाई मुरकर, दीपिका जाधव, तेजस राणे, आरोग्य सहाय्य प्रशांत बुचडे, यांच्यासह कणकवली नगरपंचायतचे नगरसेवक, विद्यार्थी मुख्यअंगणवाडी सेविका,शहरातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात अंगणवाडीतील चिमुकल्यांनी नृत्य, गाणी आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला दिनाचे औचित्य साधत लहान मुलांमधील कलागुणांना वाव देण्याचा तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.





