संविता आश्रमाच्या टिमकडून गुजरातच्या सुमन विकी खारवाचे कुटुंबासह पुनर्मिलन.

जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमच्या टिमने गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील सुमन विकी खारवा (वय ४०) या महिलेचे यशस्वीपणे त्यांच्या कुटुंबासोबत पुनर्मिलन घडवून आणले.
सुमन विकी खारवा हिला मानसिक विमनस्क स्थितीमुळे १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सावंतवाडी पोलीस स्टेशनमार्फत आश्रय आणि सुरक्षिततेसाठी संविता आश्रमात दाखल करण्यात आले.
आश्रमाच्या टिमने तत्काळ तिच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.सुमनने दिलेल्या गावाच्या माहितीनुसार,जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे आणि आश्रमाच्या टीमने गुगल सर्चचा वापर करून सुरेंद्रनगर कंट्रोल रूम आणि लखतर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला.पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने तिच्या भावाचा फोन नंबर मिळवून व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबाशी संवाद साधण्यात आला.
तपासात समोर आले की, सुमन तिच्या पतीसोबत कामासाठी गोव्यातील मडगाव येथे गेली होती आणि मानसिक अस्वस्थतेमुळे हरवली. नंतर ती सावंतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील सुरवडे गावात पोहोचली. तेथून तिला संविता आश्रमात दाखल केले गेले.
लीना पालकर, नर्स सोनाली, विजया आणि आशिष कांबळी यांनी सुमनच्या गाव आणि कुटुंबाशी संपर्क साधण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
अलीकडेच तिच्या सासू शोभा घोरू खारवा आणि इतर कुटुंबीयांनी संविता आश्रमात येऊन सुमनला सुरक्षितपणे घरी नेले.
संविता आश्रमाच्या टिमच्या समर्पणाने आणि सिंधुदुर्ग, महाराष्ट्र पोलीस तसेच गुजरात पोलीस यांच्या सहकार्याने, एक मानसिक आजार असलेली महिला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबासोबत पुन्हा मिळाली.
जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांनी आश्रम टिमसह महाराष्ट्र आणि गुजरात पोलीस यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले आणि गुगल सर्चच्या मदतीने हा पुनर्मिलन शक्य झाल्याचे नमूद केले.





