रस्ते अपघात टाळणे ही पोलिसांचीच नव्हे तर प्रत्येक जबाबदार नागरिकाची जबाबदारी!

महामार्ग पोलीस मदत केंद्र कणकवली च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक, वैशाली आडकुर यांचे आवाहन
महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेले रस्ते अपघात आणि त्यातून होणारे मृत्यू ही चिंतेची बाब आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक वाहन चालकाने वाहतुकीचे नियम पाळून जबाबदारीने वाहन चालविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन चालकाने जबाबदारीने वाहन चालवून स्वतः सोबतच इतरांच्या सुरक्षिततेबाबत देखील काळजी घ्यावी असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली आडकुर यांनी केले आहे. याबाबत त्यांनी आवाहन करताना म्हटले आहे,
वेगावर नियंत्रण ठेवा – निर्धारित वेगमर्यादेचे पालन करा. सीटबेल्ट व हेल्मेटचा वापर करा – स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या. मद्यसेवन करून वाहन चालवू नका. मद्यपान करून वाहन चालविणे जीवघेणे ठरू शकते.
मोबाईलचा वापर टाळा – वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे किंवा संदेश पाहणे टाळा.
सुरक्षित अंतर ठेवा – पुढील वाहनापासून योग्य अंतर राखा आणि घाईघाईने ओव्हरटेक करू नका.मोटारसायकलने महामार्गावर प्रवास करताना हेल्मेट बंधनकारक आहे. रस्ते अपघातात डोक्यावर हेल्मेट नसलेल्या मोटार सायकल स्वार व पाठीमागील व्यक्तीचा मृत्यू झालेल्यांची संख्या खूपच आहे.
झोप किंवा थकवा जाणवत असल्यास वाहन थांबवा .विश्रांती घेऊनच पुढील प्रवास सुरू करा.
वाहतुकीचे सर्व नियम पाळा – लेन शिस्त, दिशादर्शक चिन्हे आणि वाहतूक सूचनांचे पालन करा.
वेगापेक्षा जीवन अनमोल आहे. काही मिनिटे वाचविण्याच्या घाईत स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. पालकांनी आपल्या मुलांकडे वाहने देताना विशेष काळजी घ्यावी.आपल्या अल्पवयीन मुलांच्या हट्टापायी त्यांच्याकडे वाहने देऊ नका.
रस्ते अपघात टाळणे ही केवळ पोलिसांचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.






