कुडाळ न. पं. बैठकीत नगरसेवकांचा प्रशासनाबाबत नाराजीचा सूर

कुडाळ नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत ‘कचरा’ प्रश्न गाजला
घनकचरा प्रकल्प, अनधिकृत बांधकाम अहवाल, कचरा गाड्या विषय गाजले
कुडाळ नगर पंचायतच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वच नगरसेवकांचा प्रशासनाबाबत कमालीचा नाराजीचा सूर दिसून आला. कचरा असुदे, चुकीचे बांधकाम असू दे, कचरा गाड्या दुरुस्ती असुदे, अशा विविध गोष्टीबाबत नगरसेवक आणि नागरिकानी सूचना करून देखील प्रशासन त्याची दखल घेत नाही, असा सूर सर्वच नगरसेवकांनी लावल्याचे पाहायला मिळाले. घनकचरा प्रकल्प, अनधिकृत बांधकामांचा अहवाल, कचरा गाड्यांची नादुरुस्ती या विषयांवरून सभेत जोरदार आणि सखोल चर्चा झाली.
कुडाळ नगर पंचायतीची सर्वसाधारण सभा सोमवारी सकाळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्याधिकारी विनायक ओंधकर, उपगराध्यक्ष किरण शिंदे, गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, निलेश परब, ऍड राजीव कुडाळकर, उदय मांजरेकर, मंदार शिरसाट, नगरसेविका संध्या तेरसे, आफरीन करोल, अक्षता खटावकर, ज्योती जळवी, श्रेया गवंडे, सई काळप, नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, चांदणी कांबळी उपस्थित होते.
नगर पंचायतीच्या माध्यमातून कुडाळ एमआयडीसी येथे घन कचरा प्रकल्प होणार आहे. पण त्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्याबाबत चर्चा करण्यात आली. नगर पंचायतीची स्वतःची जागा असल्याने दत्तनगर येथे असलेला सुका कचरा प्रकल्प करता येणार नसल्याचे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले. या प्रकल्पासंदर्भात उपनगराध्यक्ष यांनी स्थानिक नागिरीकांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. जर स्थानिक नागरिकांना प्रकल्प नको असेल तर मी नागरिकांच्या बाजूने राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. चर्चेत भाग घेताना नगरसेवक अभि गावडे यांनी आमदार निलेश राणे यांनी सुद्धा दोन नागिरकांचा जरी विरोध असेल तर हा प्रकल्प होणार नाही याची आठवण करून दिली. त्यावर नागरिकांशी चर्चा करा असे किरण शिंदे यांनी सांगितले. पण त्यांना प्रेझेंटेशनसाठी बोलावून सुद्धा नागरिक आलेले नव्हते याची नगरसेवक ऍड. राजीव कुडाळकर यांनी आठवण करून दिली. मच्छीमार्केटच्या मागे असलेल्या आठ गुंठे जागेवर हा प्रकल्प उभारावा असेही किरण शिंदे यांनी सुचविले.
कचऱ्याचा प्रश्न पुढे कचरा गाड्यांवर आला. शहरात कचरा उचलण्यासाठी सध्या आठ पैकी पाच गाड्याच कार्यरत आहेत. तीन गाड्या बंद आहेत. ज्या गाड्या सुरु आहेत त्यांची देखील वारंवार दुरुस्ती येते. कंत्राटदार पुण्याचा आहे. त्याच्या १५ लाख डिपॉझिट पैकी १० लाखातून गाड्या दुरुस्त करा असे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी सुचविले. पुढील एक दोन महिन्यात कचरा उचलण्याचा ठेका बंद होणार आहे. त्यामुळे नवीन टेंडर काढताना स्थानिकांना संधी द्यावी अशी मागणी अभि गावडे यांच्या सह इतर नगरसेवकांनी केली. याच विषयावरून, आम्ही प्रशासनाला ज्या गोष्टी सुचवतो त्या अंमलात आणल्या जात नाहीत याकडे नगरसेवक अभि गावडे यांनी लक्ष वेधले.
नगरपंचायत हद्दीतील जे मोकळे क्षेत्र व रस्ते रेखांकन होवूनही अद्यापपर्यंत नगरपंचायतीचा ताब्यात नाहीत, अशा जागा मालकाना नोटिसा पाठवून त्या ताब्यात घेण्यात याव्यात असे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच ज्यांनी अद्यापपर्यंत न प च्या ताब्यात रस्ते आणि मोकळया जागा दिल्या नाहीत अशा लोकांना तेवढ्या वर्षाचा दंड आकारण्याबाबत मुख्याधिकारी श्री. औंधकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांच्या कडून दंड आकारणी झाली नाही तर नगर पंचायतीचे नुकसान होईल. पण त्यासाठी वेळ कमी असल्याने पुढच्या आर्थिक वर्षांपासून याची कार्यवाही व्हावी अशी मागणी नगरसेविका संध्या तेरसे यांच्यासह इतर नगरसेवकांनी केली. शहारत कविलकट्टा सारख्या काही भागात तेथील बिनशेती जागेवर ग्रीन झोन लावला आहे, हा त्यांच्यावर अन्याय असल्याचे नगरसेवक अभि गावडे आणि विलास कुडाळकर यांनी सांगितले.
शहरात विविध संकुलाचे एसटीबी प्लँट बंद असल्याने तिथल्या नागरिकांना किंवा सोसायटीला नगर पंचायत नोटिसा काढते. पण त्याची पूर्तता बिल्डरने करणे आवश्यक असताना बिल्डर ते काही ना करताच बिल्डिंग रहिवाशांच्या ताब्यात देऊन निघून जातो. पुढे नगर पंचायतच्या नोटीस गेल्यावर भुर्दंड नागरिकांना पडतो. याकडे संध्या तेरसे, अभि गावडे यांनी लक्ष वेधले. नगर पंचायतीला आम्ही कामे सुरु असताना वारंवार चुकीच्या गोष्टी नगर पंचायत प्रशासनाच्या निदर्शनाला आणतो. पण प्रशासन दखल घेत नाही अशी खंत संध्या तेरसे यांनी व्यक्त केली. हिंदू कॉलनीमध्ये रस्त्यावर पार्किंग केले जाते याकडे सुद्धा सौ. तेरसे यांनी लक्ष वेधले.
शहरात १४३४ स्ट्रीट लाईट आहेत. त्यांच्या देखभालीपोटी महिन्याला १ लाख ७० हजार खर्च येतो. पण यासाठी दुसऱ्या व्हिन्सी ग्लोबल आणि बीएसी इंफ्राटेक या एजन्सीचा खर्च जास्त असल्याने त्यांना कामे देऊन नयेत, असे सभागृहात ठरविण्यात आले. नगर पंचायतीच्या वतीने ३ मोकाट गाई पकडल्या आहेत. त्यांच्या लिलावासाठी कोणी पुढे येत नाहीत असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. त्यांना मुळदे येथील गोशाळेमध्ये ठेवावे, त्याचा खर्च सर्व नगरसेवक मिळून देतील असे नगरसेवक अभि गावडे यांनी सुचविले.
कुडाळला ‘क’ वर्ग नगर परिषद व्हावी असे पत्र गटनेता विलास कुडाळकर यांनी दिले आहे. त्यावर चर्चा करण्यात आली. त्याचा प्रस्ताव पाठवण्याचे ठरविण्यात आले. तसेच भंगसाळ नदीकिनारी एसटीबी प्लांट उभारण्यात बाबत चर्चा झाली. ती जागा सगळ्या नगरसेवकांनी जाऊन पहावी अशी सूचना अभि गावडे यांनी केली. शहरात १० गुंठे जागेत स्त्री शक्ती उद्यान उभारण्याबाबत देखील मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी माहिती दिली. बायोगॅस प्रकल्प होण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी जाणार असल्याचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी सांगितले. ओला कचरा प्रक्रिया पावसाळ्यात होणे कठीण असल्याकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले. त्यावर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काम करावे असे नगरसेवक अभि गावडे यांनी सुचविले.





