नाटळ जि. प. मतदार संघातली ठाकरे सेनेचे उमेदवार उत्तम लोके यांना पोलीस संरक्षण द्या!

उत्तम लोके यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संदेश उर्फ गोट्या सावंत यांची पोलिसांकडे मागणी
पोलीस संरक्षणाचा खर्च स्वतः करण्याची दर्शवली तयारी
नाटळ जिल्हा परिषद मतदार संघातील प्रतिस्पर्धी असलेले ठाकरे गटाचे उमेदवार उत्तम लोके यांना पोलीस संरक्षण द्या. अशी मागणी भाजपाचे नाटळ जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी पोलीस अधीक्षक यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी व कणकवली पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनामध्ये श्री सावंत यांनी म्हटले आहे, उत्तम लोके यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून माझ्यावरती बेछूट व बदनानीकारक आरोप सातत्याने करत आहेत. मी गेली 35 वर्षे राजकारणात सक्रिय आहे. विकासकामांच्या आधारावर मी माझी धुरंधर व कर्तुत्ववान प्रतिमा केली आहे. पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हरकुळ व नाटळ जिल्हा परिषद मतदार संघातील ठाकरे सेनेच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तर काहीजणांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आपले उमेदवारी अर्ज देखील मागे घेतले आहेत. तसेच नाटळ जिल्हा परिषद मतदार संघातील अनेक ग्रामपंचायती सदस्यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे लोके यांचा पराभव निश्चित झाला असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 4 फेब्रुवारी रोजी त्यांनी माझ्यावर व माझ्या पत्नीवर मारहाण करण्याबाबत तसेच धमकी दिल्या बाबत खोटे आरोप केले आहेत. व त्यांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो असे खोटे प्रतिज्ञापत्र देखील दाखल केले आहे. व या प्रतिज्ञा पत्राच्या माध्यमातून माझी बदनामी करत मते मिळवण्याचा लोके यांचा प्रयत्न आहे. लोके यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेला कोणताही आरोप किंवा गुन्हा मी केलेला नाही. परंतु लोके यांनी केलेल्या आरोपा प्रमाणे कोणताही राजकीय गुन्हा त्यांच्या विरोधात घडल्यास किंवा माझ्या विरोधकांनी तो त्यांच्या बाबतीत घडवल्यास किंवा लोके किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून असा प्रकार घडवून आणल्यास त्याचा परिणाम उद्या होणाऱ्या मतदानावर होणार आहे. तसेच स्वतःचा पराजय होणार हे माहिती असल्याने त्यांनी जीवाचे बरे वाईट केल्यास त्याचा दोष माझ्यावर ठेवला जाईल. उत्तम लोके यांच्या जीवाला माझ्यापासून किंवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यापासून कोणताही धोका नाही. त्यामुळे उत्तम लोके यांना उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षण देण्यात यावे व त्या संरक्षणाचा खर्च करण्यास मी तयार आहे. पोलीस संरक्षण दिल्यास ते करत असलेले आरोप खरे की खोटे हे देखील स्पष्ट होणार आहे असे श्री सावंत यांनी या निवेदनात म्हटले आहे.





