नेरूर सायचे टेंब येथील उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे यांची उपस्थिती
कुडाळ तालुक्यातील नेरूर सायचे टेंब येथे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या प्रचारसभेत उबाठा गटाला मोठा धक्का देत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
महायुतीचे जिल्हा परिषद उमेदवार संजय पडते आणि पंचायत समिती उमेदवार नीता नाईक व ममता देसाई यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार निलेश राणे यांनी यावेळी सायचे टेंब येथील ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. मतदारसंघातील विकासकामे आणि महायुतीचे व्हिजन त्यांनी जनतेसमोर मांडले. “सामान्य जनतेचा विकास हेच महायुतीचे ध्येय आहे,” असे सांगत त्यांनी उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. या पक्षप्रवेशामुळे नेरूर परिसरात महायुतीची पकड अधिक मजबूत झाली असून विरोधकांना हा मोठा धक्का मानला जात आहे. या राजकीय सोहळ्याला अनेक ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये प्रामुख्याने जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी महापौर, मुंबई महानगरपालिका दत्ता दळवी,
उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, जिल्हा परिषद उमेदवार संजय पडते, पंचायत समिती उमेदवार
निता नाईक व ममता देसाई नेरूर सरपंच सौ. भक्ती घाडीगांवकर, वालावल सरपंच राजेश प्रभू
यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





